नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे उद्घाटन केले. याशिवाय १५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही त्यांनी केली. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी देशवासीयांना २२ जानेवारीला अयोध्येत न येण्याचे आवाहन केले.
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत पूर्ण झालेल्या भव्य राम मंदिरात मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला जाणार आहे. याबाबत देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साह आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत पोहोचत आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल आणि गेस्ट हाऊस आधीच फुल्ल झाली आहेत. रेल्वे आणि बसची तिकिटेही बुक झाली आहेत. गर्दी पाहता प्रशासनाकडूनही लोकांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचदरम्यान आता नरेंद्र मोदींनीही जनतेला आवाहन केले आहे.
अयोध्येतील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्या सर्व देशवासियांना माझी एक विनंती आहे. २२ जानेवारीला होणार्या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाला स्वतः अयोध्येत येण्याची इच्छा आहे. परंतु तुम्हाला हे देखील माहित आहे की प्रत्येकाला येणे शक्य नाही. प्रत्येकासाठी अयोध्येला पोहोचणे खूप कठीण आहे. त्यामुळे देशातील सर्व राम भक्तांना २२ जानेवारीला औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी २३ तारखेनंतर त्यांच्या सोयीनुसार अयोध्येला यावे. २२ तारखेला अयोध्येला यायचं ठरवू नका. प्रभू रामाला काही त्रास होईल, असं आपण काहीही करणार नाही. आपण ५५० वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस वाट पाहूया, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केले.
'संपूर्ण जग २२ जानेवारीची वाट पाहत आहे'
आपल्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचा उल्लेख करताना म्हटले, 'आज संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्येतील जनतेमध्ये कमालीचा उत्साह असणे स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील प्रत्येक माणसाचा पूजक आहे. मीही तुमच्यासारखाच उत्सुक आहे. आम्हा सर्वांचा हा जल्लोष आणि उत्साह अयोध्येच्या रस्त्यांवर पूर्णपणे दिसत होता. जणू काही अयोध्या नगरी रस्त्यावर आली आहे. या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.