नवी दिल्ली : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी पीडित कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून ही रक्कम दिली जाणार आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून आज (सोमवार) ही माहिती देण्यात आली. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. याच कक्षातील सात चिमुकल्यांना वाचवण्यात यश आले. मृत्यू पावलेली बालके एक ते तीन महिने वयाची होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देश हळहळला. तसेच ही घटना रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच घडल्याचे सांगत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. तसेच या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले. भंडारा रुग्णालय दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समितीही नेमण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले होते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून, नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले होते.