नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने पसरताना दिसत आहेत. देशातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात एका दिवसात हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ही १२९ दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना वाढत्या कोरोना संसर्गावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीचे बैठक बोलावली आहे. आज दुपारी ४.३० वाजता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक होणार आहे. कोरोनाबाबत परिस्थिती हातळण्यासाठी तयारीचा आढावा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांची देखील बैठक झाली होती. त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे.
भारतात सुमारे चार महिन्यांनंतर कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोविड-19 XBB प्रकाराचा वंशज XBB 1.16, गेल्या काही दिवसांत भारतात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढीमागे असू शकतो. भारताव्यतिरिक्त, हा प्रकार चीन, सिंगापूर, युनायटेड स्टेट्स आणि इतरांसह विविध देशांमध्ये देखील वेगाने पसरला आहे.
एका अहवालानुसार, कोरोनाच्या XBB 1.16 या प्रकारामुळे नवीन लाट येण्याची शक्यता वाढू शकते. कोरोना प्रकारांवर नजर ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठानुसार, भारतात सध्या कोरोनाच्या XBB 1.16 प्रकारातील सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ही खबरदारी घ्या...
- खबरदारी म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत.
- खोकताना व शिंकताना हातरुमाल किंवा कपड्याने तोंड झाकून घ्या. आपले नाक, चेहरा व डोळ्यांना स्पर्श केल्यानंतर हात साबणाने धुऊन काढा.
- रुग्णांनी पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे. धूम्रपान टाळावे.
- लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या आहारात घ्याव्यात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम