नवी दिल्ली: बिपरजॉय वादळाने कालपासून पुन्हा जोर पकडला आहे, पाकिस्तानच्या दिशेने जात असलेले हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने जात आहे. १५ जून रोजी कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्टीदरम्यान 'बिपरजॉय' या तीव्र चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन गुजरात सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलच्या टीम्स किनारी भागात तैनात करत आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये निवारा केंद्रे उभारणार आहेत.
द्वारका, पोरबंदर, जुनागड, गीर सोमनाथ, राजकोट, दाहोद, छोटा उदेपूर, नर्मदा, भरूच, वलसाड, नवसारी, तापी, वडोदरा, डांग, अमरेली, भावनगर येथे येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, भूविज्ञान सचिव एम रविचंद्रन, कमल किशोर, सदस्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, चक्रीवादळामुळे १४ जून आणि १५ जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.