"टिळकांच्या स्वप्नातील सशक्त भारताची निर्मिती आता हाेतेय"; PM मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 06:08 AM2023-08-02T06:08:11+5:302023-08-02T06:08:57+5:30

टिळक स्वराज संघ व लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आला.

PM narendra Modi honored with Lokmanya Tilak National Award modi says Lokmanya Tilak's dream of a strong India is now in the making | "टिळकांच्या स्वप्नातील सशक्त भारताची निर्मिती आता हाेतेय"; PM मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

"टिळकांच्या स्वप्नातील सशक्त भारताची निर्मिती आता हाेतेय"; PM मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

googlenewsNext

पुणे : लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असलेल्या सशक्त, आत्मनिर्भर भारताची निर्मिती आता होत आहे. त्यामुळेच टिळकांच्या भूमीत त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना आनंदाबरोबरच आता जबाबदारीत अधिक वाढ झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. गुजरातमध्येही लोकमान्यांना मानणारा युवावर्ग होता व त्यात सरदार वल्लभभाई पटेल होते, असेही मोदी यांनी सांगितले.

टिळक स्वराज संघ व लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित हाेते.

लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. इंग्रजांना भारतीयांना फक्त राजकीय पारतंत्र्यात टाकायचे नव्हते तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातही तेच करायचे होते. ते ओळखून ‘टीम स्पिरीट’ तयार करण्याचे मोठे काम त्यांनी केले. ‘लाल - बाल - पाल’ ही त्रयी त्यातूनच निर्माण झाली. त्यांना अपेक्षित असलेल्या भारताची निर्मिती आता होत आहे. ते जिथे असतील तिथून आशीर्वाद देत असतील.
नरेंद्र माेदी, पंतप्रधान

‘वृत्तपत्रावर दबाव नसावा’
शरद पवार यांनी मोदी यांचे पुरस्कारासाठी अभिनंदन केले. पवार म्हणाले की, अनेकांची राज्य त्याकाळात होती, मात्र, ती त्यांच्या नावाने ओळखली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी शुन्यातून राज्य निर्माण केले, मात्र, ते भोसल्यांचे म्हणून नाही तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले गेले. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी वृत्तपत्र हे शस्त्र म्हणून तयार केले. वृत्तपत्रावर कसलाही दबाव नसावा, असे त्यांचे मत होते.

‘गीतारहस्य’ ग्रंथ भेट
डॉ. दीपक टिळक यांनी प्रास्ताविक केले. रोहित टिळक यांनी पंतप्रधान मोदी यांचा परिचय करून दिला. हृषिकेश बडवे यांनी लोकमान्य स्तुतिस्तवन केले. लोकमान्य टिळक यांचा प्रसिद्ध ग्रंथ गीतारहस्य भेट देऊन डॉ. टिळक यांनी मोदी यांचे स्वागत केले. टिळक स्मारक विद्यापीठाने तयार केलेल्या मोदी यांच्यावरील ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी लोकमान्य टिळक यांच्याबरोबरच नरेंद्र माेदींचाही गौरव केला. रस्ते वाट पाहण्यासाठी नव्हे, तर चालण्यासाठी असतात, हे मोदींनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे मोदी यांनी केलेल्या कामाची पावतीच आहे, असे ते म्हणाले.

Web Title: PM narendra Modi honored with Lokmanya Tilak National Award modi says Lokmanya Tilak's dream of a strong India is now in the making

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.