आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी अवयवदान आणि स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व सांगण्यासोबतच लोकांना कोरोना विषाणूबाबत सतर्क केले.
'मन की बात'या कार्यक्रमाचा आज ९९ व्या भाग प्रसारीत झाला. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित करताना, लोकांना पवित्र रमजान महिन्यासह विविध आगामी सणांसाठी शुभेच्छा दिल्या, पण, देशातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला. 'सण साजरे करा, पण नेहमी सतर्क राहा',असा संदेशही पंतप्रधान मोदींनी दिला.
'देशात काही ठिकाणी कोरोनाही वाढत आहे. म्हणूनच तुम्ही सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे, स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. एक महिन्यापूर्वी देशभरात कोविड-19 संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या १०० च्या आत होती, तिथे आता एकापेक्षा जास्त आणि दररोज दीड हजार नवीन रुग्णांची नोंद होत आहे, असंही मोदी म्हणाले.
'भारतात कोरोना विषाणूचे १८९० नवीन रुग्ण आढळले आहेत, जे १४९ दिवसांतील सर्वाधिक आहे. त्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९४३३ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशात एकाच दिवसात २२०८ रुग्ण आढळले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.
यासोबतच पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात अवयवदानाचे महत्त्वही अधोरेखित केले. 'आज देशात अवयवदानाविषयी जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तीन पटीने वाढली आहे. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना रक्तदानासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदान करणाऱ्यांच्या नातेवाइकांचे अनुभव ऐकून घेतले. “तुमचा एक निर्णय अनेकांचे जीव वाचवू शकतो, जीवन घडवू शकतो.”, असंही पंतप्रधान म्हणाले.