नवी दिल्ली - ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता फारसा वेळ उरलेला नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जाते. भाजपासमोर पहिल्यांदाच विरोधी पक्षांच्या ऐक्याचे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची I.N.D.I.A आघाडी विजयाचा दावा करत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकात विरोधी एकजुटीचीही कसोटी आहे.
जर I.N.D.I.A.ने या विधानसभा निवडणुका जिंकल्या तर २०२४ च्या आधीचा हा सर्वात मोठा फटका असेल. याची भाजपला जाणीव आहे. अशा परिस्थितीत पक्षाचा सर्वात मोठा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मैदानात उतरणार आहेत. येत्या सहा दिवसांत, सोमवार ते शनिवार या ५ राज्यांपैकी चार राज्यांना पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. चारही ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा प्रस्तावित आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याआधीच पंतप्रधान मोदी निवडणूक मोडमध्ये आले आहेत.
पंतप्रधान मोदी शनिवारी छत्तीसगडमधील बिलासपूर शहराला भेट देणार आहेत. भाजपाच्या 'परिवर्तन यात्रे'च्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहत ‘परिवर्तन महासंकल्प रॅली’लाही संबोधित करणार आहेत. गेल्या तीन महिन्यांतील पंतप्रधान मोदींचा हा तिसरा छत्तीसगड दौरा आहे. या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा छत्तीसगड विधानसभेच्या २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून पराभव झाला होता. १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला या निवडणुकीत केवळ १५ जागा मिळू शकल्या. राज्यात विधानसभेच्या ९० पैकी ६८ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. काँग्रेसकडे सध्या ७१ जागा आहेत. विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपने गेल्या महिन्यात २१ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
रविवारी तेलंगणा दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तेलंगणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १ ऑक्टोबरला महबूबनगर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर पीएम मोदी ३ ऑक्टोबरला निजामाबादला पोहोचतील. दोन्ही ठिकाणी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी जाहीर सभांनाही संबोधित करणार आहेत. तेलंगणात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
गांधी जयंतीला मध्य प्रदेशात
२ ऑक्टोबर गांधी जयंतीला मोदी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला भेट देणार आहेत. तेथे दोन जाहीर सभा घेणार आहेत. ५ ऑक्टोबरला मोदी पुन्हा मध्य प्रदेश दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. जबलपूर आणि जगदलपूरमध्ये ते जाहीर सभा घेऊ शकतात.
राजस्थानमध्येही सभा
२ ऑक्टोबर रोजी पीएम मोदी राजस्थानच्या चित्तोडगडमध्येही जाहीर सभा घेणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी ते पुन्हा राज्यात येतील आणि जोधपूरला भेट देतील. जोधपूर प्रदेश हा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याठिकाणीही नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.