दोन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मायदेशी परतले. परंतू, ते दिल्लीला न जाता थेट बंगळुरूला पोहोचले आहेत. मी स्व:ताला रोखू शकलो नाही, असे मोदी बंगळुरु विमानतळावर म्हणाले.
40 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ग्रीस भेट होती. पंतप्रधान मोदींच्या आधी इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये पंतप्रधान असताना ग्रीसला भेट दिली होती. दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी ग्रीसला पोहोचले होते. ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी सहा वाजता मोदींचे विमान एचएएल विमानतळावर उतरले. तिथे स्वागताला जमलेल्या लोकांना त्यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी जय जवान, जय किसान, जय अनुसंधाचा नारा दिला. येथून पंतप्रधान मोदी इस्रोच्या मुख्यालयात पोहोचतील आणि चांद्रयान-३ पाठवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमला भेटतील.
जे दृश्य मी बंगलोरमध्ये पाहतोय, तेच दृश्य मला ग्रीस आणि दक्षिण आफ्रिकेतही पाहायला मिळाले. तुम्ही इतक्या पहाटे आलात, मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी परदेशात होतो. म्हणून मी ठरवलं की भारतात गेलो तर आधी बंगळुरूला जाईन. सर्वप्रथम मी त्या शास्त्रज्ञांना नमन करेन, असे मोदी म्हणाले.