जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 02:39 PM2024-09-19T14:39:25+5:302024-09-19T14:39:44+5:30

'काँग्रेस-एनसी-पीडीपीने राज्यात फूटीचे राजकारण केले होते. पण भाजप सर्वांना जोडत आहे.'

PM Narendra Modi in J&K Three families responsible for destruction of Jammu and Kashmir; PM Modi's attack from Srinagar | जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

PM Narendra Modi in J&K :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी(दि.19) श्रीनगरमध्ये आपल्या पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'काल येथे पहिल्या टप्प्यातील मतदान झाले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पहिल्यांदाच राज्यात दहशतीच्या सावलीशिवाय मतदान झाले. काश्मीरच्या विध्वंसाला तीन घराणे जबाबदार आहेत, मात्र आता राज्य या घराणेशाहीच्या तावडीत राहणार नाही,' असं पीएम मोदी म्हणाले.

'कालच 7 जिल्ह्यांमध्ये पहिल्या फेरीचे मतदान झाले. पहिल्यांदाच दहशतीच्या सावलीशिवाय हे मतदान झाले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक मतदानासाठी घराबाहेर पडले ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मतदानासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले. सर्वांनीही मोकळ्या मनाने मतदान केले. अनेक जागांवर मतदानाचे विक्रम मोडले. किश्तवाडमध्ये 80% पेक्षा जास्त, डोडा जिल्ह्यात 71% पेक्षा जास्त मतदान, रामबनमध्ये 70% पेक्षा जास्त आणि कुलगाममध्ये 62% पेक्षा जास्त मतदान झाले. अनेक जागांवर गतवेळचे मतदानाचे विक्रम मोडले.' 

विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार : पंतप्रधान मोदी
मोदी पुढे म्हणतात, 'काँग्रेस-एनसी-पीडीपीने राज्यात फूटीचे राजकारण केले होते. पण भाजप सर्वांना जोडत आहे. काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार आहेत. या तिन्ही कुटुंबांना वाटते की, त्यांच्यावर कुणी प्रश्न उपस्थित करू शकतत नाही. खुर्चीवर बसून तुम्हाला जनतेला लुटायचे आहे. तुमचा न्याय्य हक्क हिरावून घेणे हे या लोकांचे काम आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीरला फक्त अराजकता दिली. पण आता जम्मू-काश्मीर या तीन राजघराण्यांच्या ताब्यात राहणार नाही.'

दुसरी पिढी वाया जाऊ देणार नाही: पंतप्रधान मोदी
'जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करणे, जम्मू-काश्मीरविरुद्ध कट करणाऱ्या प्रत्येक शक्तीला पराभूत करणे आणि येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. या तीन कुटुंबांकडून दुसरी पिढी नष्ट करू देणार नाही. येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरळीत सुरू आहेत. मुलांच्या हातात पेन, वह्या, लॅपटॉप असतात. आज राज्यात नवीन शाळा, नवीन महाविद्यालये, एम्स, वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी बांधल्याच्या बातम्या येतात,' असेही मोदी यावेळी म्हणाले.
 

Web Title: PM Narendra Modi in J&K Three families responsible for destruction of Jammu and Kashmir; PM Modi's attack from Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.