PM Narendra Modi in LokSabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच मोदींनी विरोधी पक्षांवर विशेषतः काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, काँग्रेस एकच प्रोडक्ट पुन्हा पुन्हा बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र त्यात त्यांना यश येत नाही. त्यांनी नाव न घेता राहुल गांधींवर निशाणा साधला.
आम्ही गरीबांसाठी चार कोटी घरे बांधली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच शहरी भागातील गरिबांसाठी ८० लाख घरे बांधण्यात आली आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात ही घरे बांधली असती तर काय झाले असते? काँग्रेस सरकारच्या गतीने कामे झाली असती तर ही कामे पूर्ण व्हायला १०० वर्षे लागली असती, यात पाच पिढ्या गेल्या असत्या, असेही मोदींनी नमूद केले.
घराणेशाहीवरून टीकामोदी म्हणाले की, आपण घराणेशाही त्याला म्हणतो, जेव्हा एखादे कुटुंब पक्ष चालवते. जो पक्ष कुटुंबातील सदस्यांना अधिक प्राधान्य देतो. ज्या पक्षातील सर्व निर्णय कुटुंबातील सदस्य घेतात. आज 'इंडिया' आघाडी म्हणून विरोधकांची जी स्थिती झाली आहे याला काँग्रेस पक्ष सर्वात जास्त जबाबदार आहे. काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची मोठी संधी मिळाली होती, परंतु ती जबाबदारी १० वर्षांत पार पाडता आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मी नेहमीच म्हटले आहे. अनेकांनी निवडणूक लढवण्याची हिंमत गमावल्याचे मला दिसते. मी ऐकले आहे की अनेक लोक जागा बदलण्याचा विचार करत आहेत. आता अनेकांना लोकसभेऐवजी राज्यसभेत जावेसे वाटते. विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मी नेहमीच म्हटले आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला.