PM Narendra Modi in Lok Sabha: आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही. जास्तीत जास्त १०० ते १२५ दिवस राहिले आहेत. केवळ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाही, तर संपूर्ण देश सांगत आहे की, ‘अब की बार ४०० पार’. शक्यतो या आकड्यांच्या खेळात जात नाही. मात्र, देशाचे मत आणि सूर समजू लागला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतीलच, मात्र भारतीय जनता पार्टीला ३७० जागांवर विजयी करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान मोदी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासूनच काँग्रेसवर सडकून टीका केली. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ खूप मोठ्या निर्णयांचा ठरणार आहे. लाल किल्यावरून भाषण करताना सांगितले होते. तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही त्याबाबतचा पुनरुच्चार केला होता. पुढील एक हजार वर्षांपर्यंत देशाला समृद्ध आणि सिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले पाहायचे आहे. तिसऱ्या कार्यकाळात पुढील हजार वर्षांच्या देशाच्या वाटचालीसाठी एक मजूबत पाया तयार केला जाईल. देशातील १४० कोटी जनतेच्या क्षमतेवर माझा खूप मोठा विश्वास आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
ओबीसी समाजावर यूपीए सरकारने खूप मोठा अन्याय केला आहे?
काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारने ओबीसींना न्याय दिला नाही. ओबीसी समाजावर अन्याय केला. काही दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांचा आम्ही सन्मान केला. सन १९७० मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या. त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. ज्या संविधानासाठी कर्पूरी ठाकूर यांनी जीवन व्यक्तीत केले, त्याग केला, त्यांचा अपमान काँग्रेसने केला, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
दरम्यान, आमच्या सरकारने शेकडो कायदे रद्द केले, अमृत भारत आणि नमो भारत ट्रेनने भारत प्रगतीच्या मार्गावर आला. प्रभू रामाचे मंदिर भारताच्या महान सांस्कृतिक परंपरेला ऊर्जा देत राहील. विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्यात ते (विरोधक) अपयशी ठरले. देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, काँग्रेस सरकार या गतीची कल्पनाही करू शकत नाही. एवढे काम पूर्ण व्हायला १०० वर्षे लागली असती. तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.