PM Narendra Modi in LokSabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी(दि.5) लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी कुटुंबवादावरुन काँग्रेसला घेरले. तसेच, पुढच्या निवडणूकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसली, असा टोलाही लगावला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांनी दीर्घकाळ त्या बाकांवर(विरोधी बाकावर) राहण्याचा संकल्प केला आहे. आजकाल तुम्ही लोक (विरोधक) ज्या प्रकारे मेहनत करत आहात, जनता तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. आज तुम्ही ज्या उंचीवर आहात, त्यापेक्षा जास्त उंचीवर तुम्ही नक्कीच पोहोचाल आणि पुढच्या निवडणुकीत प्रेक्षक गॅलरीत दिसाल. जसे तुम्ही अनेक दशके इथे बसला होता, आता अनेक दशके तिथे बसण्याचा तुमचा संकल्प जनता पूर्ण करेल, अशी टीका पीएम मोदींनी यावेळी केली.
किती दिवस समाजात फूट पाडणार?पीएम मोदी पुढे म्हणाले की, तुम्ही आणखी किती काळ समाजात फूट पाडत राहणार आहात? या लोकांनी देशाचे खूप तुकडे केले आहेत. दहा वर्षे कमी नाहीत, काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती. पण ती जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले. ते स्वत: अपयशी, म्हणून विरोधी पक्षातील काही चांगल्या लोकांनाही पुढे येऊ दिले नाही. त्यांनी स्वतःचे आणि विरोधकांचेही इतके मोठे नुकसान केले. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे, असे मला नेहमीच वाटते. हे निवडणुकीचे वर्ष आहे, थोडे तरी कष्ट करा, काहीतरी नवीन घेऊन या. त्याच त्याच जुन्या गोष्टी आणू नका, असा घणाघातही मोदींनी यावेळी केली.
घराणेशाहीवरुन टीकाघराणेशाहीचा जेवढा फटका देशाला बसला आहे, तेवढाच फटका काँग्रेसलाही बसला आहे. कुटुंबवाद देशासाठी खुप धोकादायक आहे. खरगे या सभागृहातून त्या सभागृहात गेले, गुलाम नबी पक्षातूनच बाहेर गेले. हे सर्वजण घराणेशाहीचे बळी ठरले. तेच तेच प्रोडक्ट पुन्हा पुन्हा लॉन्च केल्यामुळे तुमचे दुकान बंद होत आहे, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी यावेळी केली.