लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचे दौरे सुरू आहेत. पीएम मोदींनी आज गुरुग्राममध्ये आयोजित कार्यक्रमात द्वारका एक्सप्रेसवेच्या हरियाणा भागाचे उद्घाटन केले. हा एक मोठा द्रुतगती मार्ग आहे. या एक्सप्रेसवेमुळे राष्ट्रीय महामार्ग-४८ वरील दिल्ली आणि गुरुग्राम दरम्यानची वाहतूक सुरळीत होण्यास आणि गर्दी कमी होण्यास मदत होईल.
गुरुग्राममधील खेडकी दौला टोल प्लाझा जवळून दिल्लीतील महिपालपूरमधील शिवमूर्तीपर्यंत हा एक्सप्रेसवे गुरुग्राममध्ये १८.९ किलोमीटर आणि दिल्लीत १०.१ किलोमीटरचा विस्तारित आहे. ९,००० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्ग आणि इतर मुख्य रस्त्यांवरील रहदारीची परिस्थिती कमी होण्याची अपेक्षा आहे. या एक्स्प्रेसवेच्या उद्घाटनामुळे दिल्ली-गुडगाव द्रुतगती मार्ग आणि इतर मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, 'पूर्वीची सरकारे काही छोटी योजना बनवायची, काही छोटे कार्यक्रम आयोजित करायचे आणि पाच वर्षे तेच करत होते. भाजप सरकार ज्या वेगाने काम करत आहे, त्यादृष्टीने पायाभरणी समारंभ आणि उद्घाटनासाठी वेळ आणि दिवस कमी पडत आहेत.
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मला आज द्वारका एक्सप्रेसवे देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. या प्रकल्पासाठी ९ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आजपासून दिल्ली आणि हरियाणादरम्यानचा वाहतुकीचा अनुभव कायमचा बदलेल. हा आधुनिक एक्स्प्रेस वे केवळ वाहनांमध्येच नाही तर दिल्ली एनसीआरमधील लोकांच्या जीवनात 'गिअर शिफ्ट' करेल, असंही मोदी म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले, २०२४ सुरू होऊन अजून तीन महिनेही पूर्ण झालेले नाहीत आणि इतक्या कमी कालावधीत १० लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले आहे. याशिवाय माझ्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनीही विकास प्रकल्पांची पायाभरणी व उद्घाटने केली आहेत. आज ज्या ठिकाणी द्वारका द्रुतगती मार्ग बांधण्यात आला आहे, एक काळ असा होता की लोक संध्याकाळनंतर येथे येणे टाळायचे. टॅक्सीचालकही इथे येऊ नका, असे सांगत. हा संपूर्ण परिसर असुरक्षित मानला जात होता. मात्र आज अनेक मोठ्या कंपन्या येथे येऊन आपले प्रकल्प उभारत आहेत. हे क्षेत्र एनसीआरमधील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक बनत आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.