पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झारखंडला मोठी भेट दिली. आज पंतप्रधान मोदी यांनी येथे तब्बल 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले, तसेच पायाभरणी केली. याच बरोबर पंतप्रधान मोदी यांनी देवघर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही केले (Deoghar Airport). हे विमानतळ बांधण्यासाठी तब्बल 410 कोटी रुपये एवढा खर्च लागला असून, हे झारखंडमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. याशिवाय, पीएम मोदींनी देवघरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचेही (AIIMS) उद्घाटन केले, येथे 250 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी, आम्ही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, या मंत्रानुसार काम करत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
झारखंडला 16800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट -पंतप्रधान मोदी यांनी देवघर दौऱ्यादरम्यान, विमानतळ आणि एम्ससह तब्बल 16,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी मोदी म्हणाले, बाबा धामला आल्यानंतर, सर्वांचेच मन प्रसन्न होते. आज देवघरमधून झारखंडच्या विकासाला गती देण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभले आहे. बाबा बैद्यनाथ यांच्या आशीर्वादाने 16,000 कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी आज करण्यात आली. यामुळे झारखंडच्या आधुनिक कनेक्टिव्हिटीला, ऊर्जा, आरोग्य, विश्वास आणि पर्यटनाला मोठी गती मिळेल.
बिहार आणि पश्चिम बंगाललाही होणार फायदा -पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'हे प्रकल्प झारखंडमध्ये सुरू होत असले तरी, बिहार आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांना याचा थेट फायदा होणार आहे. म्हणजेच या प्रकल्पांमुळे पूर्व भारताच्या विकासालाही गती मिळेल. राज्यांच्या विकासातून राष्ट्राचा विकास, याच विचाराने गेल्या 8 वर्षांपासून देश काम करत आहे. एवढेच नाही तर, याच विचाराने आणि भावनेने गेल्या 8 वर्षांत महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्ग, अशा सर्व मार्गांनी झारखंड जोडण्याचा प्रयत्न झाला आहे,' असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी सांगितलं कोणत्या मंत्रावर काम करत आहे केंद्र सरकार -पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'केंद्र सरकार कनेक्टिव्हिटीबरोबरच श्रद्धा आणि अध्यात्माशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर सुविधा निर्माण करण्यावरही भर देत आहे. बाबा बैद्यनाथ येथेही प्रसाद योजनेंतर्गत आधुनिक सुविधांचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच, आम्ही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रानुसार, काम करत आहोत,' असे मोदी म्हणाले.