अलिगढ: राजकारण केवळ समाजाचा एक भाग आहे. पण राजकारण-सत्तेपेक्षा समाज वेगळा असतो. सत्तपेक्षा समाज मोठा आहे आणि त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी समारंभात बोलत होते. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या १४ वर्षांपूर्वीच्या विधानाला अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं.समाजात वैचारिक मतभेद असतात. मात्र जेव्हा देशाचा विषय असतो, त्यावेळी सगळ्यांनी मतभेद बाजूला सारायला हवेत. व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची असो, तिनं देशाला आत्मनिर्भर करण्यात योगदान द्यायला हवं. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून बाहेर पडलेल्या अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाचं योगदान दिलं. वैचारिक बैठक वेगळी असूनही ते देशासाठी लढले, असं मोदींनी म्हटलं.आपण एक लक्ष्य समोर ठेवून मार्गक्रमण सुरू केल्यावर काही जणांना त्रास होईल. अशा प्रवृत्ती प्रत्येक समाजात असतात. मात्र आपण त्यांच्या पुढे जायला हवं. गेल्या शतकात मतभेदांमुळे बराच वेळ वाया गेला. मात्र आता वेळ वाया न घालवता आत्मनिर्भर भारताचं लक्ष्य गाठण्यासाठी आपण पावलं टाकायला हवीत, असं मोदी म्हणाले.अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण होत असल्यानं विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांबद्दल संशोधन करावं, असं आवाहन मोदींनी केलं. 'लोकांना फारसे परिचित नसलेले, विस्मृतीत गेलेले अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत. विद्यार्थ्यांनी ७५ आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची आणि २५ महिला स्वातंत्र्य सैनिकांची माहिती गोळा करावी,' असं मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं.जे देशाचं आहे, ते देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आहे, असं मोदी म्हणाले. मोदींनी या विधानातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. देशातल्या संसाधनांवर सर्वप्रथम अल्पसंख्यांकांचा अधिकार असल्याचं मनमोहन सिंग यांनी १४ वर्षांपूर्वी म्हटलं होतं. स्वच्छ भारत मिशनमुळे शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींचं प्रमाण ७० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आल्याचं ते पुढे म्हणाले.