नवी दिल्ली - पुढील वर्षात उत्तर प्रदेश आणि पंजाबसह एकूण पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. निवडणुका होणार असलेल्या सर्व राज्यांतील प्रस्तावित कामांना मंत्र्यांनी प्राधान्य द्यावे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. (PM Narendra Modi instructions to ministers work on priority basis in electoral states)
या पाच राज्यांत होणार आहेत निवडणुका -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर सर्वच मंत्रालये रोजच्या रोज बैठका घेत आहेत. विशेषतः उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कामांवर अधिक भर दिला जात आहे. याच बरोबर विकास कामांसंदर्भात याद्याही तयार केल्या जात आहेत. पुढील वर्षात, देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत.
उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप? -या पाचही राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकताच एबीपी सी-व्होटरने सर्व्हे केला होता. यानुसार, उत्तर प्रदेशात भाजपला 259 से 267 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय समाजवादी पक्षाला 109-117 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, बीएसपीला 12-16 जागा, काँग्रेसला 3-7 जागा आणि इतरांना 6-10 जागा मिळू शकतात.
पंजाबमध्ये आपला मिळू शकतात 51 ते 57 जागा -या सर्वेक्षणानुसार, आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 38 ते 46 जागा मिळू शकतात. तसेच आम आदमी पक्षाला 51 ते 57 जागा मिळू शकतात. दुसरीकडे अकाली दलाला 16 ते 24 जागा मिळू शकतात. तर भाजपला केवळ 1 जागा मिळू शकते आणि इतरांनांही केवळ एकच जागा मिळू शकते.
अशी असेल गोवा आणि उत्तराखंडची स्थिती -सर्वेक्षणानुसार, उत्तराखंडमध्ये भाजपला 44 ते 48 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 19 ते 23 जागा, आम आदमी पार्टीला 0 ते 4 जागा आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजप पुन्हा एकदा सरकार बनवू शकते. येथे 22 ते 26 जागा भाजपच्या खात्यात येऊ शकतात. तर काँग्रेसला 3-7 जागा मिळू शकतात. याशिवाय, 4-8 जागा आम आदमी पक्षाला आणि 3-7 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.
मणिपूरमध्ये भाजप आघाडीला 32 ते 36 जागा मिळण्याची शक्यता - या सर्वेक्षणानुसार, मणिपूरमध्ये काँग्रेसला 18 ते 22 जागा मिळू शकतात, तर भाजप आघाडीला 32 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनपीएफला केवळ 2 ते 6 जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतरांना 0 ते 4 जागा मिळू शकतात. मणिपूरमध्ये भाजपला 40 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर 35 टक्के मते काँग्रेस, 6 टक्के एनपीएफ आणि 17 टक्के मते इतरांना मिळण्याची शक्यता आहे.