नवी दिल्ली: देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर प्रथमच एका दिवसात रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेल्याने केंद्र सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिलला सायंकाळी 6.30 वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी कोरोना संदर्भात चर्चा करणार आहेत. (PM Narendra Modi To Interact With Chief Ministers On Covid-19 And Vaccination)
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. तर केंद्रीय आरोग्यमंत्री 6 एप्रिलला सांयकाळी 6.30 मिनिटांनी 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, कालच्या आढावा बैठकीत कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना 5 सूत्री कार्यक्रम सांगितला आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, कोव्हिड नियमांचे पालन आणि लसीकरण जर संपूर्ण प्रामाणिकपणाने आणि बांधिलकीने राबविले गेले, तर या महामारीचा प्रसार थांबविण्यात प्रभावी ठरू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
एक विशेष मोहीम राबविली जाणार काल (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना आढावा बैठक घेतली. त्याअंतर्गत, 6 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान कोरोना टाळण्यासाठी देशभरात एक विशेष मोहीम राबविली जाणार आहे. ज्या अंतर्गत मास्क घालणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कशी ठेवता येईल, या सर्व बाबींची अंमलबजावणी केली जाईल. रविवारी कोरोना महामारीवरील प्रतिबंध आणि लसीकरण कार्यक्रमाच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींनी हे सांगितले.
केंद्रीय टीमला पाठविण्याचे निर्देशबैठकीत नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्यविषयक स्रोतांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व बाधित भागात बेड कमी होऊ नये, यासाठी आधीच तयारी करण्यास सांगितले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर इत्यादींची आगाऊ व्यवस्था करण्यास सांगितले. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबसारख्या राज्यांत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा विचार करता केंद्रीय टीमला तेथे पाठविण्याचे पंतप्रधानांनी निर्देश दिले. तसेच, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येविषयीही चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात कोरोनाचे 1,03,558 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशातील कोरोना संक्रमित लोकांची संख्या 1,25,89,067 वर पोहोचली आहे.