मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसने भाजपाला हादरा दिला. तिन्ही राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली. या पराभवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवासाठी १५ वर्षांची अँटी इन्कम्बन्सीही (सरकारविरोधी लाट) कारणीभूत असल्याचं सांगतानाच, आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करून पुढची आखणी करत असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं. या पराभवांमुळे पक्षाचं मनोधैर्य अजिबात खच्ची झालं नाही आणि २०१९ मध्ये जनता आम्हालाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी राजकारणासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्याची सुरुवात झाली ती पाच राज्यांच्या निवडणूक निकालांपासून. मोदींच्या उत्तरांमधील ठळक मुद्दे....
>> तेलंगणा आणि मिझोरममध्ये भाजपा सत्तेवर येईल असा विचार मीही केला नव्हता आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनाही तसं वाटत नव्हतं.
>> छत्तीसगडमध्ये आमचा पराभव झाला, पण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही.
>> १५ वर्षांची अँटी इन्कम्बन्सी घेऊन आम्ही मैदानात उतरलो होतो. त्याचा फटका छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये बसला. त्याशिवाय आम्ही कुठे कमी पडलो यावर चर्चा सुरू आहे, आखणी सुरू आहे.
>> पण त्याचवेळी, हरियाणात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही जिंकल्या. त्रिपुरामध्ये ९०-९५ टक्के यश मिळवलं. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्येही लक्षणीय यश मिळालं.
>> जिंकणं आणि हरणं हा एकच मानदंड नाही.
>> मोदी लाट ओसरली असं म्हणणाऱ्यांचं अभिनंदन. कारण, मोदी लाट कधीतरी होती हे ते स्वीकारताहेत.
>> देशात मोदी लाट वगैरे नाही, मोदी जिंकू शकत नाहीत, काही करू शकत नाहीत, असं २०१३-१४ मध्ये काही ठरावीक लोक बोलत होते. ते कोण लोक आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ते आजही तीच भाषा बोलताहेत. ज्यांच्यासाठी ते काम करतात, त्यांच्यासाठी त्यांना हे असं चित्र उभं करावंच लागतं.
>> लाट ही फक्त आणि फक्त जनतेच्या आशा-आकांक्षांची असते. आपल्या आशा-आकांक्षा कोण पूर्ण करेल हे जनता ठरवते आणि त्याचीच लाट उसळते. आज जनतेत उत्साह आणि विश्वास आहे आणि जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.