नवी दिल्लीः २०१९च्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी घराण्यावर जोरदार हल्ला चढवून येणाऱ्या काळातील राजकीय 'युद्धा'चे संकेत दिले आहेत.
'ज्यांच्या चार पिढ्यांनी देश चालवला आणि जे स्वतःला 'फर्स्ट फॅमिली' समजतात ते जामिनावर बाहेर आलेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप आहे. ही मोठी गोष्ट आहे. जी मंडळी त्यांच्या सेवेत आहेत, ती हे सत्य लपवून वेगळ्याच गोष्टी पुढे करण्याचा प्रयत्न करताहेत', अशी खरमरीत टीका पंतप्रधान मोदींनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत केली आहे.
२०१९ ची निवडणूक ही 'मोदी विरुद्ध कुणीतरी' अशी होणार नसून ती 'जनता विरुद्ध महाआघाडी' अशी होईल, असं मत मोदींनी मांडलं. मोदी हे जनतेच्या प्रेमाचं आणि आशीर्वादांचं प्रकटीकरण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.