नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीलाच एएनआय या वृत्तसंस्थेला 95 मिनिटांची मुलाखत दिली आहे. येत्या लोकसभा निवडणूक 2019च्या पार्श्वभूमीवर मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मोदींची ही मुलाखत अनेक वृत्तवाहिन्या प्रसारित करत आहेत. यावेळी मोदींनी लोकसभा निवडणूक, राम मंदिर उभारणीबाबत महत्त्वांची विधानं केली आहेत. राम मंदिरासाठी सरकार अध्यादेश आणणार नसल्याचं मोदींनी स्पष्ट केलं आहे. घटनात्मक मार्गानंच सरकार राम मंदिर उभारणार असल्याचं मोदींनी मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे. तसेच 70 वर्षं देशात सत्ता उपभोगलेल्यांमुळेच राम मंदिर झालं नसल्याचं मोदींनी सांगितलं आहे.
मोदी मुलाखत LIVE अपडेट्स
काँग्रेस एक विचार, एक संस्कृती आहे. ही संस्कृती देशात पसरली आहे. त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमुक्त भारत असं म्हणतो तेव्हा त्या संस्कृतीतून देशाला मुक्त करण्याचं मी सांगत असतो. देशात ताकदवान विरोधी पक्ष नाही हे देशाचं दुर्दैव आहे.
सर्जिकल स्ट्राइक करूनही पाकिस्तानच्या वर्तणुकीत काहीही बदल झालेला नाही. एका युद्धानं पाकिस्तान हा सुधारणारा देश नाही. तसेच असा विचार करणं ही मोठी चूक आहे. पाकिस्तानला सुधारण्यास आणखी वेळ लागेल..
'ज्यांच्या चार पिढ्यांनी देश चालवला आणि जे स्वतःला 'फर्स्ट फॅमिली' समजतात ते जामिनावर बाहेर आलेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप आहे. ही मोठी गोष्ट आहे. जी मंडळी त्यांच्या सेवेत आहेत, ती हे सत्य लपवून वेगळ्याच गोष्टी पुढे करण्याचा प्रयत्न करताहेत.'
नोटाबंदी हा देशाच्या अर्थव्य़वस्थेला दिलेला झटका नव्हता. आम्ही जनतेला वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि काहीच जण पुढे आले.