देशापुढे एक संधी आहे, एक काँग्रेस सरकारचे मॉडेल, तर एक भाजप सरकारचे मॉडेल. त्यांचा 5-6 दशकांचा कार्यकाळ आणि माझा केवळ 10 वर्षांचा कार्यकाळ. माझ्याकडे मोठ्या योजना आहेत. माझे निर्णय कुणाला घाबरवण्यासाठी किंवा दडपण्यासाठी नसून ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी, त्यांनी इलेक्टोरल बाँडपासून ते सीएएपर्यंत अनेक मुद्द्यावर भाष्य केले. तसेच विकसित भारत @2047 च्या व्हिजनवरही चर्चा झाली.
इलेक्टोरल बॉन्डवर काय म्हणाले मोदी? - राहुल गांधी यांनी इलेक्टोरल बाँड्सच्या मुद्द्यावरून केलेल्या हल्ल्याला पंतप्रधान मोदींनी चोख प्रत्युत्तर दिले. इलेक्टोरल बॉण्ड्स असतील तर तुम्हाला पैशांचा मागमूस मिळेल. कोणत्या कंपनीने ते दिले, कसे दिले, कुठे दिले. म्हणूनच तर मी म्हणतोय की, प्रत्येकाला पश्चात्ताप होईल. प्रामाणिकपणे विचार केला तर सर्वांनाच पश्चाताप होईल.
'वन नेशन, वन इलेक्शन' -'वन नेशन, वन इलेक्शन'वर बोलताना पीएम मोदी म्हणाले, ही आमची वचनबद्धता आहे. अनेकांनी आपल्या सूचना समितीला दिल्या आहेत. अनेक सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना आल्या आहेत. या अहवालाची अंमलबजावणी करू शकलो तर देशाला मोठा फायदा होईल.
व्हिजन 2047 वर काय म्हणाले मोदी? -पीएम मोदी म्हणाले, माझ्याकडे 25 वर्षांचे व्हिजन आहे. मी गुजरातमध्ये असतानाच यासंदर्भात विचार करत होतो. 2024 च्या निवडणुका ही देशापुढील एक संधी आहे. एक मॉडेल काँग्रेस सरकारचे आणि एक मॉडेल भाजप सरकारचे. त्यांचा 5-6 दशकांचा काळ आणि माझा एक दशकाचा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा, तुम्हाला कळेल.
2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील. अशा वेळी देशात एक प्रेरणा जगृत होणे हेच प्रेरणादायी आहे. 2024 हे एक महापर्व असून उत्सव म्हणून साजरे करायला हवे. माझे 2047चे जे व्हिजन आहे, ते काही मोदींचा वारसा नाही. त्यात 15-20 लाख लोकांच्या विचाराचा समावेश आहे. एक प्रकारे त्यावर देशाची मालकी आहे. मी केवळ ते कागदपत्राच्या स्वरूपात तयार केले आहे, असेही मोदी म्हणाले.