नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्व खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्टला भेट घेणार आहेत. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी सर्व खेळाडूंना आधी लाल किल्ल्यावर बोलणार आहेत. त्यानंतर स्वत:च्या शासकीय निवासस्थानी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेलं संपूर्ण पथक स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असेल. त्यांना लाल किल्ल्यावर येण्याचं निमंत्रण देण्यात येईल. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेलं संपूर्ण पथक स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असेल. याआधी कधीही खेळाडूंना अशा प्रकारचा सन्मान मिळालेला नाही. ऑलिम्पिक सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसोबत मोदी संवाद साधणार आहेत.
जपानची राजधानी टोकियोमध्ये सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेसाठी भारताकडून २२८ जण रवाना झाले. यात १२० खेळाडू आणि बाकी प्रशिक्षक, व्यवस्थापकीय सदस्यांचा समावेश आहे. भारताला स्पर्धेत आतापर्यंत दोन पदकं मिळाली आहेत. यात एका रौप्य पदकाचा आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानं तो कांस्य पदकासाठी खेळेल. महिला संघानंदेखील उपांत्य फेरीत धडक दिली आहे.