कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जवळ येत आहे. सर्वच राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीनिशी प्रचार करत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाजपसाठी फ्रंटफूटवर बॅटिंग करताना दिसत आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील शिवमोगा येथे एका जाहीर सभेला संबोधित करत काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, भयभीत झालेल्या पक्षाने आपल्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी आणले. कारण त्यांचे खोटे चालले नाही. कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
'काँग्रेस भयभीत' -सोनिया गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, "आता काँग्रेस पक्ष एवढा भयभीत झाला आहे की, आता त्यांचे खोटे बोलणेही चालत नसल्याने ते, जे प्रचारात सहभागी होत नव्हते, त्यांनाही प्रचारात आणत आहेत. काँग्रेसने पराभवाची जबाबदारी एकमेकांवर टाकायला सुरुवात केले आहे." महत्वाचे म्हणजे, प्रकृतीच्या कारणांमुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच प्रचार आणि सार्वजनिक सभांपासून दूर राहिलेल्या सोनिया गांधी यांनी शनिवारी हुबळी येथे निवडणुकीतील आपल्या पहिल्या निवडणूक सभेला संबोधित केले.
यावेळी, खासगी क्षेत्रात दरवर्षी दोन लाख नोकऱ्या देण्याचे काँग्रेसचे आश्वासनही खोटे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. एवढेच नाही तर, कोरोना महामारी असतानाही कर्नाटकात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत दरवर्षी राज्यातील 13 लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या दिल्याचा दावाही मोदींनी यावेळी केला.
खोटे बोलण्यासाठी काँग्रेसची यंत्रणा -काँग्रेसने खोटे बोलण्यासाठी एक यंत्रणाच तयार केली आहे, पण कितीही मोठा फुगा फुगवला तरी त्याचा निवडणुकीत काहीही परिणाम होणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 'बजरंगबली की जय' या घोषणेने आपल्या भाषणाची सुरुवात करताना मोदी म्हणाले की, ज्या काँग्रेसचे लक्ष्य भ्रष्टाचार आणि तुष्टीकरण आहे, ती तरुणांचे भविष्य कधीच घडवू शकत नाही.