'पापडी चाट' कॉमेंट अन् कागद फाडणाऱ्या खासदारांवर मोदी बरसले; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:20 PM2021-08-03T14:20:42+5:302021-08-03T14:25:13+5:30
PM Narendra Modi : प्रल्हाद जोशी म्हणाले, आज भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पापडी चाट' वक्तव्य अपमानास्पद होते आणि सबागृहात कागद फाडून फेकणं आणि त्यासाठी माफीही न मागणं अहंकार होता.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली. दरम्यान, संसदेचे कामकाज ठप्प केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीका केली. हा संसद, संविधान आणि लोकशाहीचा अपमान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजप नेतेही उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले, की या बैठकीदरम्यान, टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन यांचे 'पापडी चाट' वक्तव्यही अपमानास्पद असल्याचे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (PM Narendra modi lashed out on papri chat comment by tmc mp derek o brian called it insult to parliament)
खरे तर, सोमवारी टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांनी सरकारवर चर्चेविना विधेयकं मंजूर केल्यावरून टीका केली होती. त्यांनी ट्विट करत म्हटले होते, की "पहिल्या 10 दिवसांत मोदी-शहा यांनी 12 बिले पास करून घेतली आणि प्रत्येक विधेयकाला सरासरी केवळ 7 मिनिटे मिळाली. कायदे बनवत होते, की पापडी चाट!' यावेळी डेरेक यांनी कोणत्या बिलांवर किती वेळ चर्चा झाली. याचा चार्टदेखील शेअर केला. यात कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड विधेयकावर केवळ 1 मिनिटाची चर्चा होऊन मंजूर करण्यात आले.
प्रल्हाद जोशी म्हणाले, आज भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पापडी चाट' वक्तव्य अपमानास्पद होते आणि सबागृहात कागद फाडून फेकणं आणि त्यासाठी माफीही न मागणं अहंकार होता. तथापि, बैठकीत, पीएम मोदी यांनी आपल्या सर्व खासदारांना संयम बाळगत सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले आहे.
विरोधकांवर टीका करण्याची ही मोदींची एका आठवड्यातील दुसरी वेळ -
संसदेच्या कामकाजावरुन विरोधकांवर टीका करण्याची ही मोदींची एका आठवड्यातील दुसरी वेळ आहे. यापूर्वी, 27 जुलै रोजी बोलावलेल्या भाजप खासदारांच्या बैठकीतही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. देशातील कोरोना परिस्थितीवर बोलावलेल्या बैठकीचा काँग्रेसने बहिष्कार केला आणि इतर पक्षांनाही येऊ दिले नाही, असा आरोप मोदींनी केला. तसेच, त्या बैठकीत मोदींनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या कामांना जनता आणि मिडियासमोर एक्सपोज करा असेही आपल्या खासादारांना सांगितले होते.