लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानं सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार करताना दिसतंय. विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचे, लोकार्पणाचे, उद्घाटनांचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जाताहेत. वेगवेगळ्या योजनांचीही अंमलबजावणी झटपट सुरू करण्यात येतेय. अशातच, येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी 'गेमचेंजर' ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान मोदींनी केला. या योजनेअंतर्गत देशातील १२ कोटी गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत २ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केलीय. त्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे २ हजार रुपये मोदींनी पाठवले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज गोरखपूरमधील खतनिर्मिती कारखान्याचं उद्घाटन होणार आहे. हा कारखाना १९९०-९१ मध्ये बंद पडला होता. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले होते आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होत होतं. तब्बल २५ वर्षं हा मुद्दा राजकारणात गाजत होता, पण कारखाना बंदच होता. २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी या कारखान्याचं भूमिपूजन करून पूर्वांचलमधील शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवला होता. आता २०२० मध्ये या कारखान्यातून खतनिनर्मिती सुरू होणार आहे. आज याच कारखान्यात मोदी पूर्वांचलमधील शेतकऱ्यांना खतांचं वाटप करणार आहेत. त्याचवेळी त्यांनी किसान सन्मान योजनेचंही डिजिटल लाँचिंग केलं.
केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती. २ हेक्टरपेक्षा कमी जागा असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली, तरी या योजनेद्वारे 'जय किसान'चा नारा देत मोदींनी मतपेरणी केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करून मोदी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे.