नवी दिल्ली: चिनी सैन्याने लडाखमधील सीमेवर वाढवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सोमवारी टिकटॉक, हॅलो यासारख्या भारतात प्रसिद्ध असलेल्या अॅपसह सुमारे 59 चिनी अॅपवर बंदीची कारवाई करून चिनच्या मोबाईल अॅप क्षेत्राला हादरा दिला होता. यानंतर आता भारताने अॅप निर्मितीत स्वावलंबी बनवण्याची योजना तयार केली आहे. पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करत देश आता स्वावलंबी भारत अॅप इनोव्हेशन चॅलेंज लॉन्च करत असल्याचे म्हटले आहे.
नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, जर तुमच्याकडे असे एकादे प्रोडक्ट असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे काही चांगलं काही करण्याचा दृष्टीकोन आणि क्षमता आहे, तर मग तुम्ही टेक कम्युनिटीला नक्कीच जोडले जाईल, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
भारतात आज मेड इन इंडिया अॅप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्टअप समुदायामध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे GoI_MeitY आणि AIMtoInnovate हे संयुक्तपणे इनोव्हेशन चॅलेंज सुरू करत आहे. भारतातील तरुणांकडे मोठ्या प्रमाणात कौशल्य आहे. त्यामुळे मी तरुणांना आवाहन करतो की तुम्ही या चॅलेंजमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. तसेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदींनी LinkedInवर लेखही लिहिला आहे. त्यात त्यांनी या स्पर्धेची विस्तृत माहिती दिली आहे.
लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्याच चीनने कुरघोडी केल्यानंतर भारताने चीनी अॅपवर बंदी घालण्याचे पाऊल उचलले. हा निर्णय केंद्र सरकारने २९ जून या दिवशी घेतला. एक परिपत्रक जारी करत भारताने एकूण ५९ चीनी अॅपवर बंदी घातली असल्याचे जाहीर केले होते.
चिनी अॅप्लिकेशन्सचे सर्व्हर भारताबाहेर अस्तित्त्वात आहेत आणि त्यांच्यामार्फत वापरकर्त्यांचा डेटा चोरीला जात असल्याचा युक्तिवाद भारताने केला आहे. चिनी सरकारी माध्यमांनी भारताच्या या निर्णयाचे अमेरिकेची नक्कल केल्याचे वर्णन केले आहे. या अॅप्समध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर, हॅलोसारख्या बर्याच लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.