रांची: पंतप्रधाननरेंद्र मोदींनी आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला आहे. आयुष्यमान भारत अर्थात पंतप्रधान जन आरोग्य योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. देशातील 10.74 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मानवतेची खूप मोठी सेवा म्हणून ही योजना भविष्यात ओळखली जाईल, असं मोदींनी आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ करताना म्हटलं.काही लोक आयुष्यमान भारत योजनेला मोदी केअर म्हणत आहेत. काहीजण गरिबांची योजना म्हणत आहेत. मात्र मी याला गोर गरीब जनतेची सेवा म्हणतो, असं मोदी यांनी योजनेचं अनावरण करताना म्हटलं. युरोपीय देश, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा अधिकजण या योजनेचे लाभार्थी असतील, असंही ते म्हणाले. 'देशातील श्रीमंत लोकांना ज्या आरोग्य सुविधा मिळतात, त्याच सुविधा गरिबांनादेखील मिळायला हव्यात. आमच्या सरकारच्या सर्व योजनांची निर्मिती गरिबांच्या सशक्तीकरणाच्या उद्देशानं करण्यात आली आहे,' असं मोदींनी म्हटलं.यावेळी मोदींनी आधीच्या सरकारवर जोरदार टीका केली. आधीचं सरकार व्होट बँकेचा विचार करुन योजना आखायचं. अशाच योजनांनी मागील सरकारनं तिजोरी लुटली, असा आरोपदेखील त्यांनी केला. मात्र आयुष्यमान योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळेल. त्यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी उपस्थितांना दिला. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 1300 गंभीर आजारांवर उपचार होतील. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये हे उपचार करण्यात येतील, असं मोदी म्हणाले.