नवी दिल्ली : गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करून दाखवले. चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 'स्वच्छता हीच सेवा' या अभियानात संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसह बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन, उद्योगपती रतन टाटा आणि अध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. देशात 40 टक्के स्वच्छता होती. ती आता 90 टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करुन दाखविले आहे. आतापर्यंत 450 जिल्ह्यांसह 20 केंद्र शासित प्रदेश हागणदरीमुक्त झाले आहेत. फक्त शौचालये बनवल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छता ही सवय झाली पाहिजे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
याचबरोबर, नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानातील सहकार्याबद्दल अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांचे आभार मानले. अमिताभ बच्चन यांनी स्वच्छतेसाठी जनजागृती केली, त्यासाठी त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत. फक्त स्वच्छतेच्याच नाही तर सामाजिक अभियानांमध्ये अमिताभ बच्चन यांचे मोठे योगदान आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, टाटा ट्रस्टचे स्वच्छता अभियानासाठी 100 कोटी रुपयांचे योगदान असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले.
देशातील सर्व नागरीक आणि स्वच्छता प्रेमींनी या अभियानात भाग घेतल्यानेच स्वच्छता अभियान यशस्वी झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, स्वच्छता अभियानामुळे आतापर्यंत 3 लाख लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.