शाहजहांपूर-
गंगा एक्स्प्रेस वे (Ganga Expressway) उत्तर प्रदेशातील सर्वात जास्त लांबीचा 'एक्स्प्रेस वे' ठरणार आहे. याची लांबी ५९४ किमी इतकी असणार आहे. 'गंगा एक्स्प्रेस वे' मेरठपासून ते प्रयागराजपर्यंत उत्तर प्रदेशच्या १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि पश्चिम क्षेत्राला जोडण्याचं काम गंगा एक्स्प्रेस-वेच्या माध्यमातून होणार आहे. याच महत्वाकांक्षी महामार्गाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.
"उत्तर प्रदेशात आज माफियांवर बुलडोजर चालवला जात आहे. बुलडोजर तर अनधिकृत इमारतींवर चालवला जातोय पण त्याच्या वेदना अनधिकृत बांधकामांना पाठिशी घालणाऱ्यांना होत आहेत. त्यामुळेच आज संपूर्ण उत्तर प्रदेशातील जनता 'UP+YOGI' भरपूर UPYOGI असं म्हणत आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"मेरठमध्ये सोतीगंज येथे बाजार आहे. देशात कुठेही वाहनं चोरी झाली की ती याच बाजारात कापली जात असत. यावर योगींनी बुलडोझर चालवला. ज्यांना माफियांची साथ हवी आहे ते नेहमी त्यांचीच भाषा बोलतील. पण आम्ही देशाची भाषा बोलतो. मुख्यमंत्री म्हणाले की राज्यातील मुलींच्या सुरक्षेबाबत सवाल उपस्थित केले जात होते. मुलींना शाळा-कॉलेजात जाणं खूप कठीण होऊन बसलं होतं. केव्हा कुठे हिंसाचार आणि जाळपोळ होईल याची काहीच अंदाज नव्हता. पण गेल्या चार वर्षांत योगींच्या सरकारनं परिस्थिती सुधारण्यासाठी खूप मेहनत केली", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशात आज काही राजकीय पक्ष असेही आहेत की ज्यांना देशाच्या वारशावरही समस्या आहेत आणि देशाच्या विकासाबाबतची त्यांना अडचण आहे. कारण अशा लोकांना मताच्या राजकारणाची चिंता लागून राहिली आहे, असा टोला मोदींनी विरोधकांना लगावला.