नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी तेथील २० हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. तसेच बनिहाल-काझीगुंड मार्गावर बांधलेल्या बोगद्याचेही मोदी उद्घाटन करणार आहेत. त्या बोगद्यामुळे आता विनाअडथळा या मार्गावर वाहतूक सुरू राहाणार आहे.
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत. ते सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्रामपंचायतीलाही भेट देतील. देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ जलस्रोतांचा विकास आणि पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी ‘अमृत सरोवर’ नावाच्या नवीन उपक्रमाला प्रारंभ करतील, असे पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
आठ किमी लांबीचा बनिहाल-काझीगुंड बोगदाबनिहाल ते काझीगुंड या मार्गावर बोगदा बांधण्यासाठी ३१०० कोटी रुपये खर्च आला आहे. या बोगद्याची लांबी ८.४ किमी आहे. त्याच्यामुळे बनिहाल ते काझीगुंडमधील प्रवासाचे अंतर १६ किमीने व दीड तासाने कमी झाले आहे. हा ट्विन ट्यूब बोगदा असून, तो दर पाचशे मीटरवर परस्परांना जोडला आहे.