हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात 13 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 मध्ये एलपीजी कनेक्शनची संख्या सुमारे 14 कोटी होती, जी आता 32 कोटींहून अधिक झाली आहे. अलीकडेच आम्ही गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी केल्या आहेत.
रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील 13 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसेच, यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील अनेक मोठे आर्थिक कॉरिडॉर तेलंगणातून जात आहेत. सर्व राज्यांना पूर्व आणि पश्चिम किनार्यांशी जोडण्याचे हे माध्यम बनतील. तसेच, आज मी तेलंगणाच्या भूमीवरून घोषणा करत आहे की, केंद्र सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली आहे.
महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेखसणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. नवरात्र सुरू होणार आहे, पण संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करून आपण त्याआधी 'शक्ती'ची पूजा करण्याची भावना प्रस्थापित केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, 13 हजार 500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी मी तेलंगणाचे अभिनंदन करतो. आज असे अनेक रस्ते जोडणी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, जे लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतील, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरमधून वाहतूक होईल सुलभ नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरच्या माध्यमातून तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रवास करणे सोयीचे होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच. या कॉरिडॉरमुळे या तिन्ही राज्यांतील व्यापार, पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळेल. याशिवाय, या कॉरिडॉरमध्ये आर्थिक केंद्रांची ओळख करण्यात आली आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.