वाजपेयी महाभेसळ सरकार चालवत होते का?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 09:49 AM2019-02-09T09:49:07+5:302019-02-09T09:55:03+5:30

विरोधकांच्या एकीवर टीका करणाऱ्या मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल

PM Narendra Modi Is Leader Of Mahamilavat Says Congress | वाजपेयी महाभेसळ सरकार चालवत होते का?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

वाजपेयी महाभेसळ सरकार चालवत होते का?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

googlenewsNext

नवी दिल्ली: विरोधकांच्या एकीला महाभेसळ म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाकाँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधक एकत्र आल्यावर मोदी त्यांना महाभेसळ म्हणतात. मग महाआघाडीचं नेतृत्त्व करुन तीन वेळा सरकार स्थापन करणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचं नेतृत्त्व केलं होतं, असं म्हणायचं का, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मनीष तिवारींनी उपस्थित केला. 

शुक्रवारी छत्तीसगडच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जनसभेला संबोधित करताना विरोधकांच्या वाढत्या जवळिकीवरही शरसंधान साधलं. लोकांनी महाभेसळीपासून सावध राहावं, असं आवाहन त्यांनी केलं. यावरुन काँग्रेसनं मोदींवर जोरदार पलटवार केला. 40-42 पक्षांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं नेतृत्त्व करणारे मोदीच महाभेसळीचे म्होरके आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते मनीष तिवारींनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं.

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकाराचा संदर्भ देत काँग्रेसनं मोदींवर तोफ डागली. '1996, 1998 आणि 1999 मध्ये महाआघाडीचं सरकार चालवणारे अटल बिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचं नेतृत्त्व केलं होतं का?', असा प्रश्न तिवारींनी उपस्थित केला. 'आज वाजपेयींचा अंतरात्मा रडत असेल. त्यांचं सरकार महाभेसळीचं सरकार होतं का, असा प्रश्न आम्ही विचारु इच्छितो. या प्रश्नाचं उत्तर मोदींनी द्यावं,' असं तिवारी म्हणाले. 

मोदींवर हल्लाबोल करताना मनीष तिवारींनी इतिहासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 'या देशात आघाडी सरकारची प्रक्रिया कोणी सुरू केली? व्ही. पी. सिंग यांना कोणी पाठिंबा दिला? 1996 मध्ये 13 दिवसांचं सरकार कोणाच्या समर्थनामुळे स्थापन झालं? आघाडी महाभेसळ आहे, असं मोदी म्हणतात. मग एनडीएमध्ये इतर पक्ष नाहीत का? मोदी एनडीएचं नेतृत्व करतात. एनडीएमध्ये 40-42 पक्ष आहेत. त्यामुळे मोदी महाभेसळीचं म्होरके ठरतात,' अशा शब्दांमध्ये तिवारींनी मोदींचा समाचार घेतला. 
 

Web Title: PM Narendra Modi Is Leader Of Mahamilavat Says Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.