Vande Bharat Express And Amrit Bharat Train ( Marathi News ): देशभरातून वंदे भारत ट्रेनना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशातील अनेक ठिकाणांहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली जात आहे. ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांचा अयोध्या दौरा असून, यावेळी तब्बल पाच वंदे भारत एक्स्प्रेस, दोन अमृत भारत एक्स्प्रेस, अयोध्या रेल्वे स्थानक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण केले जाणार आहे.
कमी तिकीट, अद्ययावत सोयी आणि वेगवान प्रवास अशा अनेक सुविधांसह अमृत भारत ट्रेन बांधण्यात आली. देशातील काही मार्गांवर या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. अखेर अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. नवी दिल्ली ते दरभंगा या मार्गावर पहिली अमृत भारत ट्रेन चालवली जाणार असून, या मार्गावर प्रभू श्रीरामांचे जन्मस्थळ अयोध्या ते सीता मातेचे जन्मस्थळ असलेले सीतामढी ही दोन्ही स्थानके असणार आहेत.
५ वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण, मुंबईतून एक सेवा होणार सुरू
अमृत भारत ट्रेनसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण केले जाणार आहे. अयोध्या-आनंद विहार वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच श्रीमाता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस, कोईम्बतूर-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, अमृतसर-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, दुसरी अमृत भारत ट्रेन मालदा-बंगळूरु दरम्यान चालवण्यात येणार आहे. अमृत भारत ट्रेन श्रमिक आणि कामगारांना डोळ्यासमोर ठेऊन चालवल्या जात आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा या राज्यांमधून तेलंगणा, दिल्ली, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये चालवल्या जाणार आहेत.