नवी दिल्ली: आज चार राज्यांचा निकाल हाती आला. चारपैकी तीन राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. "आजचा विजय ऐतिहासिक आणि अभुतपूर्वक आहे. आज 'सबका साथ, सबका विकास'ची भावना जिंकली आहे, आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला, आज भारताच्या विकासासाठी राज्यांचा विकास, या विचाराचा विजय झाला, आज इमानदारी, पारदर्शकता आणि सू-शानाचा विजय झाला," अशी भावना पीएम मोदींनी व्यक्त केली.
मोदी पुढे म्हणाले, "या मंचावरुन मी सर्व मतदारांचे आभार मानतो. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या लोकांनी भाजपवर मोठा विश्वास दाखवला. तेलंगणातही भाजपचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतोय. तुमच्याकडून मिळणाऱ्या प्रेम आणि विश्वासामुळे आमची जबाबदारीही वाढली आहे. या निवडणुकीत देशाला विविध जातींमध्ये विभागण्याचा खूप प्रयत्न झाला, पण लोकांनी हा हाणून पाडला. माझ्यासाठी देशात फक्त चार जाती सर्वात महत्वाच्या आहेत. नारी शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुंटूंब, या चार जातींना सशक्त केल्यावरच देश सशक्त होईल."
"या चार जातींनी भाजपच्या योजना आणि भाजपच्या रोडमॅपबद्दल खूप उत्साह दाखवला. या विजयात प्रत्येक महिला, गरीब, शेतकरी, तरुण, आपला विजय पाहत आहे. प्रत्येकजण या विजयाला स्वतःचा विजय मानतोय. हा प्रत्येक मतदार भारताला 2047 मध्ये विकसित देश म्हणून पाहतोय. मी आज प्रामुख्याने महिलांचे आभार मानेल. भाजपला विजयी करण्याचे महिलांनी मनावर घेतले. महिलांची सुरक्षा, महिलांचा सन्मान फक्त भाजपच करेल, हे प्रत्येक महिलेला माहितीये."
"मागील दहा वर्षात भाजपने टॉयलेट, वीज, गॅस, पाणी, बँक खात्यांसारख्या सुविधा महिलांपर्यंत पोहोचवल्या, हे देशातील महिलांनी पाहिले आहे. भाजप प्रत्येक कुटुंबात, समाजात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी काम करत आहे, हेदेखील महिला पाहत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत महिलांनी भाजपच्या विजयाची जबाबदारी आपल्या हातात घेतली. मी महिलांना हेच सांगेल की, तुम्हाला भाजपने जी आश्वासने दिली, ती शंभर टक्के पूर्ण केले जाईल, ही मोदीची गॅरंटी आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले.