देशात कोरोनाविरोधातील लसींचे १०० कोटी डोस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना संबोधित केले. यावेळी मोदींनी देशाने कोरोनाविरोधातील लढाईत मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला. यावेळी लसीकरणावर आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात सुरू असलेल्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळा घेतली.
"भारत हा यापूर्वी अनेक लसी बाहेरून मागवत होता. जेव्हा १०० वर्षातली सर्वात मोठी महासाथ आली तेव्हा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. कोरोना महासाथीच्या सुरूवातीला भारत हा वैश्विक महासाथीचा कसा सामना करेल, भारत दुसऱ्या देशांकडून इतक्या लसी खरेदी करण्याचा पैसा कुठूण आणेल, भारताला लस केव्हा मिळणार, लस मिळल की नाही, महासाथ पसरण्यापासून थांबवता यावी यासाठी इतक्या प्रमाणात लसी भारत देऊ शकेल का?," असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. हे १०० कोटी डोस आज प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असल्याचंही ते म्हणाले.
"भारत आणि भारताच्या लोकांसाठी असं सांगितलं जात होतं, इतका संयम इतकं अनुशासन इथे कसं चालेल. परंतु आमच्यासाठी लोकशाहीचा अर्थ सर्वांची साथ आहे. सर्वांसाठी मोफत लसीची मोहीम सुरू केली. जर आजार भेदभाव करत नाही, तर लसीतही भेदभाव होणार नाही. त्यामुळे व्हिआयपी कल्चर येऊ नये याची काळजी घेतली गेली. याठिकाणी लोक लस घेण्यास येणारच नाही असं म्हटलं जात होतं. अनेक देशात लसीची कमतरता आहे. पण भारताच्या लोकांनी १०० कोटी लसी घेऊन अशा लोकांना निरूत्तर केलं आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधानांचं आवाहनदिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोठे आवाहन केले आहे. या दिवाळीच्या सणाला शक्यतो मेड इन इंडिया, भारतातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे बाजारामधील खरेदी वाढत आहे. एक काळ असा होता जेव्हा बाजारात मेड इन हे, मेड इन ते या देशांच्या वस्तू दिसायच्या. मात्र आता प्रत्येक देशवासी मेड इन इंडियाची शक्ती अनुभवत आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही वस्तूंच्या खरेदी करताना ती मेड इन इंडिया आहे का हे पाहून खरेदी करा. भारतातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य द्या, असं ते म्हणाले.