लंडन: इतिहासानं मला लक्षात ठेवावं असं वाटत नाही. सव्वाशे कोटी भारतीयांप्रमाणेच मला लक्षात ठेवलं जावं, हीच माझी इच्छा आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. लंडनमध्ये आयोजित 'भारत की बात, सबके साथ' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी गीतकार आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या प्रश्नांना मोदींनी उत्तर दिलं. तुम्हाला इतिहासानं नेमकं कसं लक्षात ठेवावं असं वाटतं, असा प्रश्न प्रसून जोशी यांनी मोदींवा विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी वेदांचं उदाहरण दिलं. 'वेद कोणी लिहिले होते हे कोणाला माहित आहे का? जगातल्या इतक्या प्राचीन ग्रंथाची रचना करणाऱ्या व्यक्तीचं नाव कोणाला माहित नसेल, तर मग मोदी कोण आहे? मी खूपच लहान व्यक्ती आहे. इतिहासात स्थान मिळवण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. मला सव्वाशे कोटी भारतीयांप्रमाणेच लक्षात ठेवलं जावं. जगानं माझ्या देशाला लक्षात ठेवावं. माझा देशच जगाला समृद्धतेचा मार्ग दाखवेल,' असं मोदींनी म्हटलं. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवरही मोदींनी यावेळी भाष्य केलं. 'विरोधकांची टीका लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. मोदी सरकारवर खूप टीका व्हावी, असं मला वाटतं. कारण टीकेमुळेच लोकशाही जिवंत राहते. त्यामुळे सरकारदेखील कायम सतर्क राहतं. त्यामुळे जर कोणी माझ्यावर टीका करत असेल, तर ते मी माझं भाग्य समजतो,' असं मोदींनी म्हटलं. सध्या टीका करण्याऐवजी आरोप केले जातात, असंही त्यांनी म्हटलं. 'टीका करण्यासाठी मेहनत करावी लागते. मात्र आता लोकांकडे त्यासाठी वेळ नाही. त्यामुळे लोक टीका करण्याऐवजी थेट आरोप करतात. हे लोकशाहीसाठी घातक आहे. टीका करायला हवी. मात्र आरोप केले जाऊ नयेत. मी नेहमीच टीकेचं स्वागत करतो. मला अनेकांनी घडवलंय. त्यांची मेहनत मी वाया जाऊ देणार नाही,' असंही मोदींनी म्हटलं.
इतिहासानं मला नव्हे, तर माझ्या देशाला लक्षात ठेवावं- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 11:37 AM