पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. पाचा राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. "भारतानं ४०० अब्ज डॉलर्सचं निर्यातीचं ध्येय गाठलं आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवतं. याचाच अर्थ जगभरात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे," असं ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जाणार असल्याचंही सांगितलं. "आज संपूर्ण जगात योग आणि आयुर्वेदाप्रती कल वाढत आहे. गेल्या आठवड्यात कतारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका योग कार्यक्रमात ११४ देशांच्या नागरिकांनी भाग घेत एक जागतिक विक्रम स्थापन केला. आयुष उद्योगाची बाजारपेठ सतत विस्तारत आहे. सहा वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ २२ हजार कोटींच्या आसपास होती. आज आयुष उत्पादन उद्योग सुमारे एक लाख ४० हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे," असंही ते म्हणाले.
जलसंधारणावर भरआपल्या संबोधनादरम्यान पंतप्रधान मोदींनी जलसंधारणावर भर दिला. "मी अशा राज्यातून आलो आहे जिथे नेहमीच पाण्याची टंचाई असते. गुजरातमध्ये या विहिरींना (Stepwells) वाव म्हणतात. गुजरातसारख्या राज्यात वावने मोठी भूमिका बजावली आहे. या विहिरी संरक्षणासाठी 'जल मंदिर योजने'ने मोठी भूमिका बजावली आहे. संपूर्ण गुजरातमध्ये अनेक विहिरंचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्यामुळे या भागातील पाणीपातळी वाढण्यासही मोठी मदत झाली. तुम्ही स्थानिक पातळीवरही अशाच प्रकारच्या मोहिमा चालवू शकता. देशातील अनेकांनी जलसंधारण हाच जीवनाचा एकमेव उद्देश बनवला आहे, याचा मला आनंद आहे," असंही मोदी म्हणाले.
निर्यात ४०० अब्ज डॉलर्सवरएकेकाळी भारतातून निर्यातीचा आकडा १०० अब्ज, कधी १५० अब्ज होता, आज भारत ४०० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतात तयार उत्पादनांची मागणी जगभरात वाढत आहे असा याचा अर्थ आहे. दुसरे म्हणजे भारताची पुरवठा साखळी दिवसेंदिवस मजबूत होत आहे. पूर्वी असं मानलं जात होतं की केवळ मोठे लोकच सरकारला उत्पादनं विकू शकतात, परंतु सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलनं हे चित्र बदलले आहे. त्यातून नव्या भारताची भावना दिसून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.