नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "मन की बात" कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला आहे. विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना "व्होकल फॉर लोकल"चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा असं आवाहन मोदींनी देशवासीयांना केलं आहे.
"जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारात कधी जायचं? नेमकी काय काय खरेदी करायची. विशेषत: लहान मुलांमध्ये याबाबत मोठा उत्साह असतो. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने जगत आहात. मर्यादेत राहून उत्सव साजरा करत आहात. यामुळे जी लढाई आपण लढत आहोत. त्यात आपला विजय देखील निश्चित आहे असंही यावेळी मोदी म्हणाले.
वाईट प्रवृत्तींवर मिळवलेला विजय म्हणून दसरा साजरा केला जातो. सत्याचा असत्यावर विजय म्हणून आपण दसरा साजरा करतो, असं मोदी म्हणाले. लवकरच सणासुदीला सुरुवात होईल. कोरोनाचं संकट असल्यानं सण संयमानं साजरे करा आणि वस्तूंची खरेदी करताना देशात तयार झालेल्या उत्पादनांना प्राधान्य द्या. लोकलसाठी व्होकल व्हा, असं आवाहन मोदींनी केलं. सणासुदीआधी, सणासुदीच्या दिवसांत लोक खरेदी करतात. त्यावेळी स्थानिक आणि स्वदेशी वस्तू खरेदी करा, असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी जवानांनाही विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सीमेवर उभ्या असलेल्या जवानांसाठी आपण यंदाच्या दिवाळीत एक दिवा लावू, असं आवाहन त्यांनी केलं. सणासुदीच्या दिवसांत फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करा, असंही मोदींनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना दसरा आणि महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या या पावन दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा-आरती करण्यात येते. माता सिद्धीदात्रीच्या आशीर्वादाने प्रत्येकाला आपल्या कार्यात सिद्धी प्राप्त होईल, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनात कोविंद यांनीही देशवासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दसऱ्याचा हे पर्व अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक आहे. आनंद आणि उत्साहाचा हा उत्सव, महामारीच्या प्रभावापासून सर्वांचं रक्षण करुन देशवासीयांना समृद्धी आणि आनंदी करेल, असे ट्विट कोविंद यांनी केलं आहे.