-हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जनतेला, विशेषतः विरोधकांना आश्चर्यचकित करण्याची प्रचंड क्षमता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न करता ते पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चूक ठरवू शकतात. इंधनाचे दर कोणत्याही क्षणी भरमसाठ वाढण्याची शक्यता आहे; तेव्हा लोकांनी आताच आपल्या वाहनाची इंधन टाकी पूर्ण भरू घ्यावी, असे आवाहन करून राहुुल गांधी यांनी इंधन दरवाढीसोबत होणाऱ्या महागाईच्या भडक्याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
दोन आठवड्यांपूूर्वी युक्रेन आणि रशियादरम्यान युद्ध भडकल्याने कच्चा तेलाचा भाव प्रतिबॅलर १३५ डॉलवर गेला आहे. रशियासह विविध देशांतून भारत आपली गरज भागविण्यासाठी ८० टक्के आयात करतो. कच्चा तेलाचा भाव प्रतिबॅरल ८० डॉलरवरून १३५ डाॅलरवर गेल्याने इंधनाचे दर वाढविले जातील. तथापि, या लोकप्रिय समजुतीनुसार इंधनाचे दर वाढविण्याचा सरकारचा बेत नाही, असे अधिकृतरीत्या समजते.सूत्रांनुसार इंधन दरवाढ करण्याची घाई नाही. जागतिक बाजारात कच्चा तेलाचा भाव प्रतिबॅरल ८५ ते ९० डॉलरवर येण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत इंधनाचे दर वाढविण्याची गरजच भासणार नाही.
जनतेच्या हित रक्षणासाठी सरकार करील हस्तक्षेप
पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांनी संसदेत सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचा भाव, चलन-विनिमय दर, कर, देशांतर्गत वाहतूक आणि अन्य घटकांचा विचार करून पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत योग्य तो निर्णय घेतील. भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकार या घटकांवर बारकाईने लक्ष ठेवून असून, सामान्य जनतेचे हिताचे रक्षण करण्यासाठी जरूर हस्तक्षेप करील.