नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे विरोधक सरकारविरोधात एकवटत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेतृत्वातील एनडीए आपली ताकत वाढवण्यावर भर देत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एनडीएच्या ३३० खासदारांची भेट घेतील आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी करतील. ३१ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांच्या विविध गटांशी चर्चा करणार आहेत.
या काळात अनेक खासदार त्यांच्या कामाची माहिती सुद्धा नरेंद्र मोदींना सुपूर्द करतील. यावेळी नरेंद्र मोदी प्रत्येक खासदाराला विजयाचा मंत्र देतील. या बैठकीमध्ये पहिला नंबर उत्तर प्रदेशच्या खासदारांचा असणार आहे. ३१ जुलै रोजी पश्चिम उत्तर प्रदेश, ब्रज, कानपूर आणि बुंदेलखंड प्रदेशातील खासदारांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला नरेंद्र मोदींव्यतिरिक्त जेपी नड्डा आणि नितीन गडकरी उपस्थित असतील. तर बैठकीचे आयोजन करण्याची जबाबदारी संजीव बल्यान आणि बीएल वर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशनंतर ३१ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या खासदारांशी संवाद साधतील. या बैठकीत नरेंद्र मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. याठिकाणी धर्मेंद्र प्रधान, शंतनू ठाकूर बैठकीचे सूत्रसंचालन करतील, एकूण 41 खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
याचबरोबर, १ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील काशी, गोरखपूर आणि अवध भागातील खासदारांची बैठक होणार आहे. यावेळी ४८ खासदार असतील. या बैठकीत पंतप्रधान मोदींशिवाय अमित शहा आणि राजनाथ सिंह सुद्धा असतील. त्याचदिवशी तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार, लक्षद्वीपच्या खासदारांसोबतही बैठक होणार आहे.
बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरयाणा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाखच्या खासदारांसोबत ३ ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदींची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ८ ऑगस्ट रोजी राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांची बैठक होणार आहे. तर ९ ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी गुजरात, दादरा नगर हवेली, दमण-दीव, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील खासदारांशी संवाद साधतील. तर ९ ऑगस्टलाच सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा या राज्यांची बैठकही होणार आहे.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजयाची हॅट्ट्रिक साधता यावी, यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपची नजर देशाच्या प्रत्येक भागावर आहे. त्यामुळे भाजपकडून सर्व प्रयत्न केले जात आहे. १८ जुलै रोजी दिल्लीत सर्व एनडीए पक्षांची बैठक झाली, ज्यामध्ये एकूण ३८ पक्ष सहभागी झाले होते. भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, भाजपचे ३०० पेक्षा जास्त खासदार आहेत. दुसरीकडे, काँग्रेस विरोधी पक्षांच्या खासदारांना एकत्र आणून इंडिया आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.