नवी दिल्ली : भारतात आज स्वांतत्र्यदिन (Independence Day 2023) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या सुमारे ९० मिनिटांच्या भाषणात त्यांनी मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
विशेष म्हणजे, पुढील १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आणि स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य लोकांसह अनेक मान्यवर मंडळी लाल किल्ल्यावर उपस्थित होती. पोहोचले होते. नरेंद्र मोदी आपले भाषण संपल्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली आले आणि थेट सर्वसामान्यांना सामोरे गेले.
नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून ते आपल्या सुरक्षेची काळजी न करता उपस्थित सर्वसामान्य नागरिकांना भेटायला गेले. ज्यावेळी नरेंद्र मोदी लोकांसमोर होते, तेव्हाचे ते दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्या टिपले. कोणी नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते, तर कोणी त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचा प्रयत्न करत होते. यावेळी नरेंद्र मोदींनी अनेक लोकांशी प्रेमाने हस्तांदोलन केले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी १८ हजारांहून अधिक लोक लाल किल्ल्यावर पोहोचले होते.
नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे...- भ्रष्टाचाराच्या विरोधात अखंड लढणार आहे. देशातून परिवारवाद उखडून लावणार आहे. लोकशाहीत परिवारवादी पक्ष ही विकृती आहे. परिवारवादामुळे विकासाला ब्रेक लागला आहे. - रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या माध्यमातून दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यासाठी नेशन फर्स्ट आणि राष्ट्र सर्वोपरी आहे. - आज भारतात महिला वैमानिकांची संख्या सर्वाधिक आहे. २ कोटी लखपती दीदींचे टार्गेट घेऊन आम्ही काम करत आहोत. - देश नवनवे संकल्प घेऊन पुढे जात आहे. भारतात जास्तीत जास्त युवाशक्ती आहे, क्षमता देशाचे नशीब बदलते.- लोकशाहीच्या मजबुतीसाठी कुटुंबवादापासून मुक्तता आवश्यक आहे. कुटुंबवाद आणि घराणेशाही हे प्रतिभेचे शत्रू आहेत, क्षमता नाकारतात.- विश्वकर्मा योजना विश्वकर्मा जयंतीला सुरू होणार असून त्यासाठी १३-१५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आमचे सरकार गरीबांसाठी समर्पित आहे.- आज भारत जुनी विचारसरणी मागे टाकून पुढे जात आहे. ज्यांची पायाभरणी आमच्या सरकारने केली, त्यांचे उद्घाटनही करत आहे. - २०१४ पूर्वी देशभरातील राज्यांना केंद्र सरकारकडून ३० लाख कोटी रूपय दिले जायचे, मात्र आता १०० लाख कोटी रूपये दिले जातात.- डेमोग्राफी, डेमोक्रेसी आणि डायव्हर्सिटी भारताची ताकद आहे. 30 वर्षाखालील युवकांची सर्वाधिक संख्या फक्त भारताकडे आहे.