नवी दिल्ली: 'नारी शक्ती वंदन' विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला खासदारांची भेट घेतली. तसेच नरेंद्र मोदी यांनी महिला खासदारांसोबत फोटोही काढला. अनेक महिलांनी विधेयक मंजूर झाल्याचा आनंद साजरा करत मिठाई वाटली. अनेक महिला सदस्यांनी नरेंद्र मोदींच्या निर्णायक नेतृत्वाबद्दल त्यांचे कौतुक केले.
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या विधेयकाला राज्यसभेने एकमताने मतदान केल्यानंतर संसदेची मंजुरी मिळाली. लोकसभेच्या विपरीत, जेथे सभागृहात उपस्थित ४५६ पैकी दोन खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते, राज्यसभेतील सर्व २१५ खासदारांनी गुरुवारी, २१ सप्टेंबर रोजी विधेयकाच्या बाजूने मतदान केले.
विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व खासदारांचे आभारही मानले. नरेंद्र मोदी म्हणाले की, नारी शक्ती वंदन विधेयक या कार्यक्रमाच्या वेळी अतिशय गतिशील महिला खासदारांना भेटण्याचा मान मिळाला. नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या उत्तीर्णतेसह, भारत एका उज्ज्वल, अधिक समावेशक भविष्याच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि आपली नारी शक्ती या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी असल्याचं नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
नारी शक्ती वंदन अधिनियम या नावाने ओळखल्या जाणार्या १२८व्या घटना दुरुस्ती विधेयकाला आता बहुसंख्य राज्यांच्या विधानसभेची मंजुरी आवश्यक आहे. जनगणनेवर आधारित संसदीय आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या प्रक्रियेनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश जागा राखीव ठेवण्याच्या विधेयकाला सरकारचा निवडणुकीचा अजेंडा' म्हणत विरोधी पक्षांनी प्रस्तावित कायदा जनगणना आणि परिसीमनापूर्वी लागू करण्यात यावा, अशी आग्रही मागणी राज्यसभेत केली.
'मोदी है तो मुमकीन है'
ऐतिहासिक विधेयक यशस्वीरीत्या मंजूर केल्याबद्दल पंतप्रधानांचे स्वागत करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, विधानसभेचा पराक्रम केवळ हेच दाखवतो की "मोदी है तो मुमकिन है" (पंतप्रधान मोदी असताना काहीही अशक्य नाही) ही केवळ एक म्हण नाही. इराणी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, "मोदी है तो मुमकिन है असे म्हणणे आम्हाला अनेकदा आले आहे. आज पंतप्रधानांनी हे पुन्हा सिद्ध केले.''