नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसने मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या आरोपांवर उत्तर देताना सडकून टीका केली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात झालेल्या आरोपांचा पाढाच वाचला. तसेच, काँग्रेसने मोठी संधी असतानाही देशाला मागे आणले, असा आरोपही केला.
यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेवर उपहासात्मक टोलाही लगावला. मोदी म्हणाले, 'येणाऱ्या काळात काँग्रेसच्या ऱ्हासावर हार्वर्डसह जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये स्टडी केली जाईल. 'तुम्हारे पाव के निचे जमीन नहीं, कमाल ये है, फिर भी तुम्हे यकिन नहीं,' असा शेर म्हणताच सभागृहात एकच हसा फिकला. मोदी पुढे म्हणतात, 2014 पासून हे लोक म्हणत आहेत की, भारत कमजोर झालाय, भारताचे कोणी ऐकत नाही. आता म्हणत आहेत की, भारत इतर देशांना धमकावून निर्णय घेत आहेत. भारत कमजोर झालाय की, मजबूत झालाय, हेच आधी तुम्ही ठरवा, असा टोलाही मोदींनी लगावला. यांना वाटतंय की, मोदींना शिव्या दिल्याने मार्ग निघेल, पण गेल्या बावीस वर्षांपासून काही करू शकले नाहीत, असंही मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणतात, वृत्तपत्रांमधील बातम्यामुळे किंवा टीव्हीवर आल्याने मोदींवर लोकांचा विश्वास नाहीये, तर मी माझे आयुष्य देशासाठी झिजवले आहे. यामुळेच लोकांचा मोदीवर विश्वास आहे. देशातील लोकांचा मोदीवर विश्वास आहे, हे काँग्रेसला कधीच कळणार नाही. खोटे आरोप करणाऱ्यांवर देशातील जनता कधीच विश्वास ठेवणार नाही. देशातील ज्या गरिबाला मोफत धान्य मिळते, तो तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. अडचणींच्या काळात मोदी लोकांच्या कामाला आला आहे, म्हणून लोकांचा मोदीवर विश्वास आहे,' असंही मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणतात, तुम्ही कितीही शिव्या द्या, आरोप करा, पण लोकांचा तुमच्यावर परत विश्वास बसणार नाही. तुमच्या शिव्यांना आणि आरोपांना या कोटी-कोटी भारतीयांना तोंड द्यावे लागणार आहे. या लोकांना तुम्ही अनेक दशके अडचणीत टाकले होते. भाजपने या लोकांना अडचणीतून बाहेर आणले आहे. काहीलोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूपकाही उद्धवस्त करायला तयार आहेत. पण, हे देशच मोदीचे कुटुंब आहे. 140 कोटी लोकांच्या सुरक्षेचे कवच माझ्या पाठीशी आहे. खोटे आरोप करुन तुम्ही कधीच हे सुरक्षा कवच भेदू शकणार नाहीत, असंही मोदी म्हणाले.