नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा भारतासह देशभरात डंका असल्याचे बोलले जाते. आतापर्यंत पंतप्रधान मोदींना परदेशातील अनेक देशांनी सर्वोच्च पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. मात्र, सरत्या २०२१ या वर्षांत सर्च करण्यात आलेल्या भारतीयांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले स्थान पटकावले आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज केसमध्ये एनसीबीकडून अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही या यादीत समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षाचा अपवाद वगळता वर्ष २०१७ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत अव्वल स्थानावर आहेत. गेल्या वर्षी बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल अनेकांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. याहू इयर इन रिव्ह्यूमध्ये नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केलेली बातमी, व्यक्तीमत्त्वे, विविध कार्यक्रम आणि बातम्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या व्यक्तीमत्त्वाबद्दल आढावा घेतला जातो. पुन्हा या वर्षी म्हणजेच सन २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
ममता बॅनर्जी, आर्यन खान, सिद्धार्थ शुक्लाचाही समावेश
याहू २०२१ इयर इन रिव्ह्यू या यादीत पंतप्रधान मोदींनंतर दुसऱ्या स्थानी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली असून, तिसऱ्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चितपट केल्यानंतर राजकारणात ममता बॅनर्जी यांची दखल अधिक ठळकपणे घेतली जात असून, भाजपविरोधातील तिसऱ्या आघाडीच्या प्रमुख नेत्या म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. याशिवाय या यादीच्या चौथ्या स्थानावर दिवंगत टीव्ही मालिका अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन खानचाही या यादीत समावेश झाला आहे. दोन महिन्यापूर्वी आर्यन खानवर एनसीबीने कारवाई केली होती. त्यानंतर आर्यन चर्चेत होता. आर्यन खान या यादीत सातव्या स्थानावर आहे.
दरम्यान, सेलिब्रिटींच्या यादीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार याचे झालेले अकाली निधन चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. पुनीत राजकुमार हे या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.