भोपाळ: मध्य प्रदेश सरकार तीन लाख कुटुंबांना घर देणार आहे. मात्र या 'लाभार्थीं'ना सरकारची कायम आठवण राहील, याची 'काळजी'ही घेतली जाणार आहे. या घरांच्या प्रवेशद्वाराजवळ आणि किचनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा फोटो असणार आहे. या घरांमध्ये लावण्यात आलेल्या टाईल्सवर मोदी आणि चौहान यांचा फोटो असेल. या टाईल्सवर 'सबका सपना, घर हो अपना,' असं घोषवाक्य लिहिलेलं असेल. मध्य प्रदेश सरकारच्या शहर प्रशासन मंत्रालयानं 4 एप्रिलला एक आदेश काढलाय. यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये मोदी आणि चौहान यांचे फोटो असलेल्या टाईल्स लावणं बंधनकारक आहे. तशा सूचनाच पालिका आयुक्त आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मोदी आणि चौहान यांचे फोटो असणाऱ्या टाईल्सचा आकार 450 X 600 मीमी इतका असेल. मध्य प्रदेश सरकारच्या या आदेशावर काँग्रेस पक्षानं टीका केली. लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांना राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याची टीका काँग्रेसनं केलीय. प्रधानमंत्री आवास योजना ही मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. 2015 मध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना परवडणारे घर देण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या वर्गासाठी ही योजना आहे.
घर घर मोदी; सरकारी घरांमध्ये किचनच्या टाईल्सवर असणार मोदींचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 7:28 PM