नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीला आता फक्त वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षानं निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा भाजपा यामध्ये आघाडीवर आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये भाजपाकडून कोणाला तिकीट द्यायचं, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जनतेची मदत घेणार आहे. मोदी त्यांच्या खासदार आणि आमदारांच्या कामाची माहिती नमो अॅपवरुन घेत आहेत. याच माहितीच्या आधारे मोदी भाजपाच्या खासदार, आमदारांचं भविष्य ठरवणार आहेत. नमो अॅपच्या माध्यमातून मोदींनी भाजपाच्या खासदार आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या अॅपच्या माध्यमातून मोदींनी विधानसभा मतदारसंघानुसार लोकांकडून फिडबॅक मागितला आहे. त्यामुळे भाजपाचे खासदार आणि आमदार नेमकं कसं काम करत आहेत, याची माहिती जनतेला थेट मोदींना देता येईल. यासोबतच मोदींनी लोकसभा आणि विधानसभेत लोकप्रिय असलेल्या नेत्यांची माहितीही जनतेकडे मागितली आहे.नमो अॅपच्या माध्यमातून जनतेकडून दिली जाणारी माहिती मोदींकडून लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी महत्त्वाची ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदारांच्या कामगिरीसोबतच मोदींनी सरकारी योजनांबद्दलचे प्रश्नदेखील लोकांना विचारले आहेत. याआधी मोदींनी 26 मे रोजी जनतेकडून जनतेच्या कामाचा फिडबॅक मागितला होता. नमो अॅपमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न:1. तुम्ही तुमच्या आमदार आणि खासदाराच्या कामावर किती समाधानी आहात ?2. तुमच्या राज्यात आणि मतदारसंघात प्रसिद्ध असलेले भाजपाचे तीन नेते कोण ?3. केंद्र सरकार आणि ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे, तिथे सर्वात जास्त प्रभावी ठरलेल्या तीन सरकारी योजन्या कोणत्या?4. सरकारचं कामकाज वेगवान आहे, असं वाटतं का?
भाजपाचे लोकसभेचे उमेदवार जनता ठरवणार? मोदी 'हा' अनोखा प्रयोग करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 5:16 PM