बंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एका लग्नसमारंभामुळे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पंचाईत झाली. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी मैसूरच्या ललित महल पॅलेसमध्ये राहणार होते. मात्र, जेव्हा सरकारी अधिकारी याठिकाणी बुकिंग करायला गेले तेव्हा या हॉटेलमध्ये खोल्याच शिल्लक नसल्याचे लक्षात आले. एका लग्नसमारंभासाठी या हॉटेलमधील बहुतांश खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या हॉटेलमध्ये फक्त 3 खोल्याच शिल्लक होत्या. मात्र, पंतप्रधानांची सुरक्षा आणि त्यांच्यासोबतचा लवाजमा लक्षात घेता या तीन खोल्या पुरेशा नव्हत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पंतप्रधानांसाठी रेडिसन ब्लू हॉटेल बुक करण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान मोदी याठिकाणी रविवार आणि सोमवारी असे दोन दिवस वास्तव्याला होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हॉटेलमध्येही एक लग्नसमारंभ होणार होता. सूत्रांच्या माहितीनुसार मोदींसाठी या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याची वेळ बदलण्यात आली. मोदी हॉटेलमध्ये येण्यापूर्वीच हा रिसेप्शन सोहळा आटोपण्यात आल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक दौऱ्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्याविरुद्ध जोरादार आघाडी उघडली आहे. सिद्धरमय्या यांच्या सरकारने केलेले घोटाळ दररोज बाहेर येत असल्याचा आरोप यावेळी मोदींनी केला.