इंदिरा गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुलना करणं अपमानास्पद - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 10:11 AM2019-02-05T10:11:19+5:302019-02-05T10:59:27+5:30
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील अधिक आक्रमकरित्या वारंवार अनेक मुद्यांवरुन भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीदेखील अधिक आक्रमकरित्या वारंवार अनेक मुद्यांवरुन भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. प्रत्येकाला रोजगार, शेतकरी कर्जमाफी आणि बहीण प्रियंका गांधी-वाड्रा यांना सक्रीय राजकारणात प्रवेश देत राहुल गांधींनी आतापर्यंत अनेक मास्टरस्ट्रोक मारले आहेत.
23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण, प्रियंका गांधी या केवळ पूर्वांचल भागापुरत्याच मर्यादित राहणार नसून त्या संपूर्ण देशात प्रचार करणार असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींच्या राजकीय प्रवेशासहीत अंतरिम अर्थसंकल्प आणि लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याबाबत बोलताना राहुल म्हणाले की, ''प्रियंका गांधी यांच्याकडे सरचिटणीसपद सोपवण्यात आल्याने, त्यांची राजकीय भूमिका केवळ एका भागापुरतीच मर्यादित नाहीय. त्यांच्याकडे सध्या एका कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, हे कार्य पूर्ण झाल्यानंतर दुसरे कामदेखील देण्यात येईल.'' दरम्यान, प्रियंका गांधींच्या राजकीय प्रवेशाबाबत राहुल गांधी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
पूर्वांचलमध्ये पक्ष वाढवायचाय - राहुल गांधी
''पूर्वांचलमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि तामिळनाडू येथे पक्ष वाढवण्याचा माझा उद्देश आहे. हे एक मोठे कार्य आहे'', असेही राहुल गांधींनी म्हटले. दुसरीकडे, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीसोबत आघाडी न झाल्यानं काँग्रेसने उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनी पूर्वांचल भागाची जबाबदारी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडे आणि पश्चिम उत्तर प्रदेश जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवली आहे.
'उत्तर प्रदेशात काँग्रेस ताकदीनिशी लढणार'
सपा-बसपा आाघाडीबाबत राहुल गांधी म्हणाले की, मायावती आणि अखिलेश यादव यांचा आदार करतो, पण आम्ही आमच्या विचारसरणीसहीत निवडणूक लढवणार आहोत. तसे पाहायला गेल्यास विचारसरणीनुसार सपा आणि बसपामध्ये काही साम्य आहेत, पण काँग्रेसची ताकद दाखवून आम्ही आघाडी न झाल्याचा फायदा घेऊ शकतो.
‘इंदिरा गांधींची मोदींसोबत तुलना करणं अयोग्य'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना करणे अयोग्य असल्याचेही राहुल गांधींनी म्हटले. इंदिरा गांधींसोबत तुलना करणं, ही बाब अपमानास्पद आहे. इंदिरा गांधींनी देशातील गरीब जनतेसाठी काम केले. पण पंतप्रधान मोदींचे प्रत्येक निर्णय याउलटच पाहायला मिळतात. शिवाय, गरिबांसाठी त्यांच्या हृदयात जागाच नाही, असा टोला राहुल गांधी यांनी हाणला आहे.
‘मोदींच्या कामाच्या पद्धतीमुळे सर्वजण नाराज’
मुलाखतीदरम्यान, राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, आपल्या 15 वर्षांच्या राजकीय कारर्किदीमध्ये एखाद्या नेत्याविरोधात विरोधक पक्षांची अशा प्रकारे एकजूट पाहिली नव्हती. शिवाय, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अन्य भाजपा नेतेदेखील मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे नाराज आहेत.