'जग आपल्यावर हसेल', चंद्रयान-3 च्या लँडिंग पॉईंटचे नाव 'शिवशक्ती' ठेवण्यावरुन काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 04:19 PM2023-08-26T16:19:36+5:302023-08-26T16:21:06+5:30

यूपीए सरकारने चंद्रयान-1 ज्या ठिकाणी उतरले, त्या ठिकाणाचे नाव जवाहर पॉईंट ठेवले; भाजपचा पलटवार

PM Narendra Modi on Chandrayaan-3:rashid-alvi-says-how-did-modi-name-the-chandrayaan-3-landing-point-shivshakti | 'जग आपल्यावर हसेल', चंद्रयान-3 च्या लँडिंग पॉईंटचे नाव 'शिवशक्ती' ठेवण्यावरुन काँग्रेसचा हल्लाबोल

'जग आपल्यावर हसेल', चंद्रयान-3 च्या लँडिंग पॉईंटचे नाव 'शिवशक्ती' ठेवण्यावरुन काँग्रेसचा हल्लाबोल

googlenewsNext

PM Narendra Modi on Chandrayaan-3: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीस दौऱ्यावरुन परतल्यानंतर आज(दि.26) बंगळुरुमध्ये इस्रोच्या (Isro) शास्त्रज्ञांना भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या. चंद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले त्या भागाला 'शिवशक्ती' नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेमुळे काँग्रेस नेते रशीद अल्वी संतप्त झाले. 

रशीद अल्वी यांची टीका

एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना राशिद अल्वी म्हणाले की, 'नरेंद्र मोदींना चंद्राच्या पृष्ठभागाला नाव देण्याचा अधिकार कोणी दिला? हे हास्यास्पद आहे. या नामकरणानंतर संपूर्ण जग आपल्यावर हसेल. चंद्राच्या त्या भागात लँडिंग झाली, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे. यावर कोणीही शंका घेऊ नये. पण चंद्र आपल्या मालकीचा नाही, तो लँडिंग पॉइंट आपल्या मालकीचा नाही. असे करण्याची भाजपला सवय झाली आहे. सत्तेत आल्यापासून ते नाव बदलत आहेत'.

'इस्रो जवाहरलाल नेहरुंमुळे'

यावेळी रशीद अल्वींना विचारण्यात आले की, यूपीए सरकारच्या काळात चंद्रयान-1 चंद्राच्या ज्या भागावर उतरले होते, त्या जागेचे नावही सरकारने जवाहर पॉईंट ठेवले होते. यावर उत्तर देताना रशीद अल्वी म्हणाले, 'तुम्ही जवाहरलाल नेहरुंशी तुलना करू शकत नाही. आज जे काही आहे, इस्रो आहे, ते पंडित जवाहरलाल नेहरुंमुळेच आहे. 1962 मध्ये पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी इस्रोची सुरुवात केली. पंडित नेहरू हे इस्रोचे संस्थापक होते. तो पूर्णपणे वेगळा विषय होता, पण पीएम मोदी यावर राजकारण करत आहेत.'

भाजपचा हल्लाबोल

भाजपने शिवशक्ती नाव ठेवण्यारुन काँग्रेसवर पलटवार केला. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, 'यूपीए सरकार असते तर त्या ठिकाणाला गांधी घराण्याचे नाव दिले असते. चंद्रावरील तो भाग इंदिरा पॉइंट किंवा राजीव पॉइंट नावाने ओळखला गेला असता. काँग्रेस सरकारने, चंद्रयान 1 जिथे उतरले, त्या ठिकाणाचे नाव जवाहर पॉइंट असे ठेवले. पण, पंतप्रधान मोदींसाठी देश प्रथम, तर काँग्रेससाठी कुटुंब प्रथम आहे,' अशी टीका पूनावाला यांनी केली.

चंद्रयान- 3 चा लँडिंग पॉइंट 'शिवशक्ती' नावाने ओळखला जाईल

बंगळुरुमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 'जिथे कोणीही पोहोचले नाही, तिथे आपण पोहोचलो आहोत. आपण जे केले, ते जे यापूर्वी कोणीही केले नव्हते. 23 ऑगस्टचा दिवस प्रत्येक सेकंदाला माझ्या डोळ्यांसमोर फिरत आहे. लँडिंगची बातमी कळताच इस्त्रो केंद्रात आणि देशभरात लोकांनी ज्या प्रकारे आनंद साजरा केला, ते दृश्य कोणीही विसरू शकत नाही. काही आठवणी अजरामर होतात, तो क्षण अजरामर झाला. चंद्रयान-3 चा विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरला, तो भाग आता 'शिवशक्ती' म्हणून ओळखला जाईल.'

Web Title: PM Narendra Modi on Chandrayaan-3:rashid-alvi-says-how-did-modi-name-the-chandrayaan-3-landing-point-shivshakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.