पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (13 डिसेंबर) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री अरबिंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एक स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. यावेळी, 'भारताला कुणीही नष्ट करू शकत नाही. भारताला कुणीही दाबू शकत नाही. भारत कधीही नष्ट होऊ शकत नाही,' असे मोदी म्हणाले.
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबरला भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. अशा या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान आले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत एक असे अमर बीज आहे, जे अति प्रतिकूल परिस्थितीत थोडे फार दाबू शकते, थोडे फार कोमेजून जाऊ शकते, परंतू ते नष्ट होऊ शकत नाही. कारण भारत हा मानवी सभ्यतेचा सर्वात परिष्कृत विचार आहे, मानवतेचा सर्वात स्वाभाविक आवाज आहे.'
मोदी म्हणाले, “श्री अरबिंदो यांचे जीवन आणि त्यांचा जन्म, हे एक "एक भारत, श्रेष्ठ भारत"चे प्रतिबिंब आहे. त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला असला तरी, त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गुजरात आणि पुद्दुचेरीमध्ये घालविले. ते जिथे-जिथे गेले तिथे-तिथे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची खोलवर छाप सोडली. स्वातंत्र्याच्या अमृतकाळासाठी ही एक मोठी प्रेरणा आहे.''
याच बरोबर मोदी म्हणाले, श्री अरबिंदो यांना हिंदी, मराठी, बंगाली आणि संस्कृतसह अनेक भाषांचे ज्ञान होते. आज भारत अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. एवढेच नाही, तर भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे," असेही मोदी म्हणाले.